Karnataka Polls : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Polls) 10 मे रोजी मतदान होणार आहे. सध्या राज्यात उमेदवारी अर्ज भरण्याची धामधूम सुरू आहे. उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. अनामत रक्कम जमा करून अर्ज भरले जात आहेत. यात काही असेही उमेदवार आहेत ज्यांच्यामुळे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.
आता हेच घ्या ना यादगीर मतदारसंघात आज एक अशी घटना घडली जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. यादगीर मतदारसंघात मंगळवारी एका अपक्ष उमेदवाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उमेदवाराने सुरक्षा रक्कम एक रुपयाच्या नाण्यांमध्ये जमा केली.
एक रुपयांचे ठोकळे ते पण किती तर चक्क दहा हजार रुपये. मग काय हे पैसे मोजता मोजता निवडणूक अधिकारी चांगलेच घामाघूम झाले. आधीच कडाक्याचा उन्हाळा त्यात हा चिल्लरचा ताप आला. त्यामुळे निवडणूक अधिकारी देखील जाम वैतागले होते.
या अपक्ष उमेदवाराने अधिकाऱ्यांसमोर नाण्यांनी भरलेली पिशवी ठेवली. त्यातील पैसे मोजता मोजता अधिकारी हैराण झाले. अपक्ष उमेदवाराने संपूर्ण मतदारसंघातील मतदारांकडून ही नाणी गोळा केली होती.
कर्नाटकातील यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारासाठी अनामत रक्कम 10 हजार रुपये आहे. म्हणजेच जो कोणी निवडणूक लढवेल, त्याला सुरक्षा म्हणून 10 हजार रुपये जमा करावे लागतील.यादगीर येथील कार्यालयात टेबलावर पडलेली नाणी मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना दोन तास लागले. यादगीर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले अपक्ष उमेदवार यंकप्पा हे बॅनर घेऊन मंगळवारी तहसीलदार कार्यालयात पोहोचले.
संपूर्ण मतदारसंघात पायी प्रवास करून मतदारांकडून नाणी गोळा केल्याचे उमेदवाराने सांगितले. त्यांनी कलबुर्गी जिल्ह्यातील गुलबर्गा विद्यापीठातून कला विषयात पदवी पूर्ण केली असून त्यांची एकूण संपत्ती ६० हजार रुपये आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यातील विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
नागाराजू यांची गडगंज संपत्ती
या निवडणुकीत असेही एक उमेदवार आहेत ज्यांची संपत्ती प्रचंड आहे. यंदा होसकोटे मतदारसंघातून भाजपने मंत्री एन. नागाराजू यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी दिलेल्या शपथपत्रात त्यांनी आपली संपत्ती तब्बल 1 हजार 609 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे.
यामध्ये त्यांच्याकडे 536 कोटींची चल संपत्ती तर 1 हजार 73 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांनी याआधी 2020 मध्ये विधानपरिषद निवडणूक लढतेवेळी 1 हजार 220 कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले होते.
नागाराजू यांच्या एकूण संपत्तीत 64 लाख 89 हजार 302 रुपये रोख तर पत्नीकडे 34 लाख 29 हजार 445 रुपये रोख आहेत. बँकेतील खात्यात 20 कोटी 12 लाख 31 हजार 11 रुपये डिपॉजिट स्वरुपात आहेत. तसेच 33 कोटी 8 लाख 1 हजार 765 रुपये फिक्स डिपॉजिट केले आहेत. 6 कोटी 16 लाख 47 हजार 987 रुपये पत्नीच्या नावे बँक खात्यात डिपॉजिट आहेत. तर आणखी जवळपास दोन कोटी रुपये मुदत ठेव स्वरुपात गुंतवले आहेत.