Karnataka Polls : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात (Karnataka Polls) भाजप केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) रविवारी बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उमेदवारांच्या यादीबाबत मोठी माहिती दिली. तसेच आपण स्वतः निवडणूक लढत असल्याचेही सांगितले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, की एक ते दोन दिवसांत पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करेल. दरम्यान, आपण शिगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
त्यांनी सांगितले की, आम्ही कर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या यादीवर चर्चा केली. येत्या एक ते दोन दिवसात ही यादी जाहीर केली जाईल. राष्ट्रीय राजधानीतील पक्षाच्या मुख्यालयात पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात सीईसी बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.
तत्पूर्वी 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या यादीवर चर्चा करण्यासाठी अमित शहा यांनी शनिवारी दिल्लीतील भाजप अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक घेतली. नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत कर्नाटक भाजप अध्यक्ष नलिनकुमार कटील, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
कर्नाटकात पुन्हा सत्तेत येण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपने 224 पैकी किमान 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे, हे विशेष. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनेही (Congress) कर्नाटकात पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यंदा राज्यात काँग्रेस चांगल्या स्थितीत आहे. निवडणुकीच्या नियोजनातही काँग्रेसने भाजपला मागे टाकल्याचे सध्या तरी दिसत आहे.
कर्नाटकच्या मैदानात राष्ट्रवादी
कर्नाटक विधानसभा (Karnataka Elections) निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कर्नाटकमध्ये भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्येच (Congress) लढत होईल असे मानले जात असतानाच अनेक प्रादेशिक पक्षांनी या रणांगणात उडी घेतली आहे. आम आदमी पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही कर्नाटक निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. काही मोजक्याच जागांवर पक्षाचे उमेदवार उभे केले जाणार आहेत, अशी घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.
काँग्रेस जिंकणार ?
कर्नाटकात सध्या परिस्थिती बदलली आहे. येथे काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, राज्यातील परिस्थिती मला माहित आहे. मी अनेक सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यावरून असे दिसत आहे की यंदा भाजप पराभूत होईल आणि काँग्रेस सत्तेवर येईल. कर्नाटकातील लोकांनाही आता बदल हवा आहे.
काँग्रेसचा मोठा निर्णय
कर्नाटकात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकांचे (Karnataka Elections) आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधी काँग्रेस (Congress) पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी कर्नाटक युनिटच्या कार्यकारिणीसाठी नवीन अध्यक्षाची नियुक्ती केली आहे. काँग्रेसने रविवारी बी. एन. चंद्रप्पा यांची राज्याच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. सध्या केशवकुमार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद सांभाळत आहेत.