Karnataka CM : कर्नाटकच्या (Karnataka) मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर गदारोळ सुरू आहे. डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या या दोन नेत्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. दोघेही सध्या राजधानी दिल्लीत तळ ठोकून आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत आहेत. विशेष म्हणजे, दोघेही मुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त अन्य पद घेण्यास तयार नाहीत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवकुमार यांनी काँग्रेस नेतृत्वाला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की ते उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार नाहीत. त्यांनी असेही विचारले की सिद्धरामय्या यांनी तीन वर्षात असे काय केले आहे ?, याआधी जवळच्या सूत्रांकडून अशी माहिती मिळाली होती की शिवकुमार यांना सहा विभागांसह उपमुख्यमंत्री पदासाठी विचारणा झाली होती.
याआधी असे म्हटले जात होते की सिद्धरामय्या मुख्यमंत्री होतील. शपथविधी कार्यक्रम गुरुवारी आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसने असे अहवाल फेटाळले आहेत. काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले, की कर्नाटकात पाच वर्षे चालेल असे स्थिर आम्ही देणार आहोत.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या सर्वात आघाडीवर आहेत. तर डी. के . शिवकुमार यांनी दावा केला आहे की 2019 मध्ये काँग्रेस आणि जेडीएस सरकार पडल्यानंतर त्यांनी काँग्रेसला राज्यात पुन्हा उभे केले. 2023 च्या निवडणुकीतही पक्षाला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले.
काँग्रेसने यंदा 135 जागा जिंकून भाजपाचा दणदणीत पराभव केला आहे. आज दिवसभरात सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. याआधी दोन्ही नेत्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. या बैठकीत सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली होती.
या दोन नेत्यांच्या दावेदारीमुळे मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स आधिक वाढला आहे. तरी देखील आज मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.