Karnataka: कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Election) प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर पाच दिवसांनी अखेर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी ठाम असलेले डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांनी अखेर माघार घेतली आहे.
पक्ष नेतृत्वाच्या निर्णयानुसार सिद्धरामय्या (Siddaramaiah) हे कर्नाटकचे मुख्यमंत्री तर शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. यापूर्वी हायकमांड राज्यात दोन-तीन उपमुख्यमंत्री करण्याच्या विचारात होते. मात्र आता डी. के. शिवकुमार हेच उपमुख्यमंत्री असतील. शिवकुमार म्हणाले, “न्यायालयातील न्यायाधीशांचा निर्णय ज्याप्रमाणे स्वीकारावा लागतो त्याचप्रमाणे मी पक्षनेतृत्वाचा निर्णय स्वीकारला आहे”.
61 वर्षीय डी. के. शिवकुमार यांना काँग्रेसचे संकटमोचक म्हटले जाते. निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळाल्यापासून ते मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम होते. यासाठी त्यांनी काँग्रेसप्रती असलेल्या समर्पणाचा आणि त्यांच्या कार्याचा दाखला दिला. सोनिया गांधींनी मध्यस्थी करेपर्यंत शिवकुमार मुख्यमंत्रीपदावर ठाम राहिले. सोनियांच्या मध्यस्थीनंतर शिवकुमार यांनी अखेर ‘पक्षाच्या हितासाठी त्याग’ करण्याचे मान्य केले.
पक्षाचे हित प्रथम
एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत डी. के. शिवकुमार म्हणाले, “एकदा आम्ही सर्व काही पक्ष नेतृत्वावर सोडले की, आम्हाला त्यांचा निर्णय स्वीकारावा लागेल. आमच्यापैकी बरेच लोक न्यायालयात युक्तिवाद करतील. शेवटी न्यायाधीश काय म्हणाले, त्यांचा निर्णय मान्य करावा लागेल. सर्व 135 आमदार म्हणाले की, आम्ही निर्णय पक्ष नेतृत्वावर सोडू. आता नेतृत्वाने निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले, “आम्ही कर्नाटकच्या जनतेला आश्वासन दिले. वैयक्तिक हित नंतर, पक्षहित आधी. ही माझी बांधिलकी आहे.” समजा सर्व प्रकारच्या कारणांमुळे आपण कर्नाटक निवडणूक जिंकलो नसतो तर काय परिस्थिती असती? आता आपण जिंकलो आहोत, आपल्याला पुढे काम करायचे आहे. मी एकटा नाही, लाखो कार्यकर्ते आहेत. उत्तम काम केले आहे. हेही बघावे लागेल.”
सोनिया गांधींमुळेच हा संघर्ष अखेर संपुष्टात आला का, असे विचारले असता? शिवकुमार म्हणाले, “मला यामध्ये सोनिया गांधी किंवा गांधी कुटुंबाला आणायचे नाही. मी नुकतीच राहुल गांधी यांची भेट घेतली. मल्लिकार्जुन खर्गे यांनाही भेटलो. एवढेच म्हणेन.
शिवकुमार म्हणाले, आमच्याकडे समर्पित टीम आहे. आम्ही सर्व प्रकारच्या अर्थव्यवस्थेवर काम केले आहे.” तज्ज्ञांच्या मते, 5 आश्वासनांच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 51,000 कोटी रुपये लागतील.
कर्नाटकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा 20 मे (शनिवार) दुपारी 12.30 वाजता होणार आहे. याशिवाय काही मंत्रीही शपथ घेणार आहेत. काँग्रेसने आज संध्याकाळी 7 वाजता बेंगळुरूमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. यात पक्षाचे केंद्रीय निरीक्षकही पोहोचणार होते. 13 मे रोजी काँग्रेसने 224 पैकी 135 जागा जिंकून बहुमत मिळवले होते. भाजपला 66 जागा मिळाल्या. तर जेडीएसला 19 जागा मिळाल्या.