Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election Results) आज मतमोजणी झाली. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत होते. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 10 मे रोजी 73.19 टक्के मतदान झाले होते.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी येथील मतदानाची टक्केवारी एक टक्क्याने वाढली आहे. मतदानानंतर जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात सरकार बदलणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला.
या एक्झिट पोलनुसार काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल असे म्हटले होते. यामध्ये भाजप नंबर दोन आणि जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. कर्नाटकातील दहा अतिमहत्वाच्या मतदारसंघांची माहिती घेऊ या ज्याकडे देशाचे लक्ष लागले होते.
- शिगगाव विधानसभा: कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे हावेरी जिल्ह्यातील शिगगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. येथे बोम्मई यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा 35978 मतांनी पराभव केला.
- वरुणा विधानसभा: म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा विधानसभा जागा काँग्रेसचे दिग्गज आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा बालेकिल्ला मानली जाते. गेल्या वेळी त्यांनी मुलगा यतिंद्र यांना येथून उमेदवारी दिली. मात्र यावेळी ते स्वतः मैदानात होते. यावेळी सिद्धरामय्या यांना टक्कर देण्यासाठी भाजपने मंत्री व्ही सोमन्ना यांना उमेदवारी दिली होती. सिद्धरामय्या यांनी वरुणा विधानसभेची जागा 46 हजारांहून अधिक मतांनी जिंकली.
- कनकपुरा विधानसभा: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार येथून सात वेळा आमदार झाले आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे आर. अशोक निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवकुमार यांनी भाजप उमेदवाराचा सुमारे 1 लाख 20 हजार मतांनी पराभव केला.
- चन्नापटना विधानसभा: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी हे चन्नापटनामधून निवडणूक रिंगणात होते. 2004 पासून ते सातत्याने या जागेवर विजयी होत आहेत. कुमारस्वामी यांच्याविरोधात भाजपचे सीपी योगेश्वर निवडणूक लढवत होते. सीपी योगेश्वर 1999 पासून वेगवेगळ्या पक्षातून पाच वेळा आमदार झाले होते. कुमारस्वामी यांनी भाजप उमेदवाराचा सुमारे 16,000 मतांनी पराभव केला.
- हुबळी-धारवाड सेंट्रल: हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून भाजपचे बंडखोर नेते जगदीश शेट्टर काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात होते निवडणुकीआधी तिकिटावरून झालेल्या वादानंतर त्यांनी भाजप सोडला. यानंतर त्यांची भाजपचे उमेदवार महेश टेंगीनाकाई यांच्याशी लढत झाली. जगदीश शेट्टर यांचा भाजप उमेदवार महेश टेंगीनकाई यांनी सुमारे 35 हजार मतांनी पराभव केला.
- चित्तपूर विधानसभा: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खर्गे हे येथून रिंगणात होते. त्यांची लढत भाजपच्या मणिकंता राठोड यांच्याशी होती. या निवडणुकीत प्रियांक यांनी भाजप उमेदवाराचा सुमारे 14,000 मतांनी पराभव केला.
- शिकारीपुरा विधानसभा: कर्नाटकात प्रथमच भाजपला विजय मिळवून देणारे ज्येष्ठ नेते बीएस येदियुरप्पा यांचा बालेकिल्ला असल्याने सर्वांच्या नजरा शिकारीपुरा मतदारसंघाकडे लागल्या होत्या. भाजपने त्यांचे पुत्र बी.वाय. विजयेंद्र यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. विजयेंद्र यांच्यासमोर काँग्रेसचे मालतेश हे रिंगणात होते. विजयेंद्र यांनी जवळपास 11,000 मतांनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.
- तीर्थहल्ली विधानसभा: राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र कर्नाटकातील तीर्थहल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत होते. त्यांच्यासमोर काँग्रेसने किमने रत्नाकर यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा भाजप उमेदवाराने 12,000 मतांच्या मोठ्या फरकाने जिंकली.
- चिकमंगळुरू विधानसभा: भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी रवी 2004 पासून या जागेवरून विजयी होत आहेत. यावेळी काँग्रेसने विजयाच्या आशेने एचडी थ थम्मय्या यांना उमेदवारी दिली होती. येथून जेडीएसने बीएम थिम्मा शेट्टी यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसच्या उमेदवाराने सीटी रवी यांचा 6000 मतांच्या फरकाने पराभव केला.
- शिवमोग्गा विधानसभा: शिवमोग्गा विधानसभा मतदारसंघ भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री केएस ईश्वरप्पा यांचा बालेकिल्ला मानला जातो. केएस ईश्वरप्पा या मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिले आहेत. यावेळी त्यांनी मुलगा के.ई.कंटेश यांच्यासाठी तिकीट मागितले होते. मात्र शिवमोग्गा येथून भाजपने चन्नाबसप्पा यांना तिकीट दिले. या निवडणुकीत भाजप उमेदवाराने २७ हजारांहून अधिक मताधिक्याने ही निवडणूक जिंकली.