Karnataka Elections : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत (Karnataka Elections) राजकीय पक्षांनी आपापली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) गुजरात निवडणुकीची रणनितीच पुढे घेऊन जाण्याच्या विचारात आहे. राज्यांतील नेत्यांवर प्रचाराची मोठी जबाबदारी सोपवली जाईल, असे मानले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाने केंद्र आणि राज्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांसह विविध राज्यांतील 50-60 नेत्यांना प्रचाराची जबाबदारी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात बैठक झाली. बैठकीत पक्षाच्या नेत्यांना राज्यात विजय सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी, पक्षाचे खासदार निशिकांत दुबे, रमेश बिधुरी, संजय भाटिया, बिहारचे आमदार संजीव चौरसिया, उत्तर प्रदेशचे आमदार सतीश द्विवेदी आणि आंध्रप्रदेशचे नेते पी. सुधाकर रेड्डी या बैठकीला उपस्थित होते.
115 जागांवर लक्ष
भाजपने विधानसभेच्या 224 पैकी 115 जागा निश्चित केल्या आहेत. प्रत्येक नेत्याला 2 ते 3 जागांची जबाबदारी देण्यात आली असून अवघड जागा जिंकण्याची शक्यता वाढवण्यास सांगितले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाने प्रमुख नेत्यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. त्याचा परिणाम संपूर्ण देशाने पाहिला. ऐतिहासिक विजयासह भाजप पुन्हा सत्तेत आला. अशा परिस्थितीत कर्नाटकात ही रणनिती आखून पुढे जाण्याचे पक्षाने ठरवले आहे.
कर्नाटकात निवडणुका कधी होणार?
राज्यातील 224 विधानसभा जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक होणार आहे, तर निवडणुकीचे निकाल 13 मे रोजी लागणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 121 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेस-जेडीएस (Congress-JDS)आघाडीला 100 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसला 70 आणि जेडीएसला 30 जागा मिळाल्या.
दरम्यान, कर्नाटकातील सत्ता राखण्यासाठी भाजपने खास रणनिती तयार केली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर लगेचच एक सर्व्हे आला होता. यामध्ये भाजप पराभूत होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते सावध झाले.
प्रचाराचे नियोजन करण्यात आले. पंतप्रधान मोदींचा प्रचार दौरा आयोजित करण्यात येणार आहे. राज्यात ठिकठिकाणी मोदी यांच्या किमान 20 रॅली होतील असे नियोजन करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात पुन्हा सत्ता मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. यंदा काँग्रेसनेही भाजपला जोरदार टक्कर देण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि जेडीएसने भाजपला मागे टाकत उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. भाजपने मात्र अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.
तीन राज्यात कमाल
ईशान्येच्या भूमीने भाजपला (BJP) पुन्हा बळ दिले आहे, तर काँग्रेस (Congress) आणि डाव्या पक्षांच्या (Left Parties) हळूहळू मागे पडत आहेत. (Assembly Elections) त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये भाजप आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे बहुमत मिळाले आहे. मेघालयात मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल.
त्रिपुरामध्ये (Tripura) भाजपने 32 जागांसह पुनरागमन केले आणि नागालँडमध्ये (nagaland) 12 जागा जिंकून आपले आव्हान कायम राखले. मेघालयमध्ये (Meghalaya) सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाने किमान संख्या गाठलेली नाही. त्रिशंकू विधानसभेत एनपीपीला 26 जागा मिळाल्या.
ईशान्येकडील निकालांमुळे या वर्षी होणाऱ्या कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपचा आत्मविश्वास वाढू शकतो. या विजयाच्या जोरावर सर्व राजकीय पक्ष मिशन 2024 च्या रणनीतीवर काम करू शकतात. नागालँडमध्ये, मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीसह त्यांचा मित्रपक्ष भाजपने पुन्हा एकदा निवडणूक जिंकून सत्ता राखण्यात यश मिळविले आहे.
काँग्रेसचे काही खरे नाही
डाव्या पक्षांशी मैत्री करून लढणाऱ्या काँग्रेससाठी (Congress) आश्वासक गोष्ट म्हणजे पक्षाने तीन जागा जिंकल्या आहेत, तर गेल्या वेळी खातेही उघडले नव्हते. त्रिपुरामध्ये प्रद्योत देबबर्मा यांच्या नेतृत्वात नवी शक्ती म्हणून उदयास आलेल्या टिपरा मोथाने भाजपचे मोठे नुकसान केले आहे. आदिवासीबहुल भागात वर्चस्व असलेल्या टिपरा मोथाने प्रथमच लढत 13 जागा जिंकल्या आहेत.
नागालँडचा निकाल स्पष्ट असला तरी अधिक वैविध्यपूर्ण आहे. येथे भाजपला 12 जागा मिळाल्या. तर त्याचा मित्रपक्ष नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) ने 25 जागा जिंकल्या. गेल्या वेळी 18 जागा जिंकल्या होत्या. यावेळीही दोघे एकत्र लढले. भाजपने 20 आणि एनडीपीपीने 40 जागांवर उमेदवार उभे केले आणि गेल्या वेळेपेक्षा सात जागा जिंकल्या.
नागालँडमध्ये काँग्रेस पूर्णपणे साफ आहे. तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सात जागा मिळाल्या आहेत. बिहारमध्ये (Bihar) सक्रिय असलेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा पक्ष जेडीयूने एक आणि चिराग पासवान यांच्या पक्ष एलजेपीने (रामविलास) दोन जागा जिंकल्या आहेत. चार जागांवर अपक्ष उमेदवारांनाही विजय मिळाला आहे.