Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Elections) काँग्रेस नेते जोरदार प्रचार करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान इमोशनल कार्ड खेळले आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी या निवडणुकीनंतर राजकारण सोडणार असल्याचे सांगितले. सिद्धरामय्या यांनी म्हैसूरमधील वरुणा येथे एका सभेला संबोधित करताना ही घोषणा केली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने वरुणा विधानसभा मतदारसंघातून सिद्धरामय्या यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसचे उमेदवार सिद्धरामय्या यांनी वरुणा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल लागणार आहेत.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार सिद्धरामय्या म्हणाले की, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. आम्ही जातीच्या आधारावर मते मागत नाही. लिंगायत समाजासह सर्व समाजाकडून आम्हाला मतांची अपेक्षा आहे, आता मुख्यमंत्री कोण होणार हे पक्ष ठरवेल.
उल्लेखनीय म्हणजे काँग्रेसने आतापर्यंत 216 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उर्वरित 8 जागांसाठी काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. लवकरच उर्वरित जागांची नावेही जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.
सिद्धरामय्यांकडे किती पैसा ?
उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात सिद्धरामय्या यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण 19 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता 9.43 कोटी रुपये आहे. तसेच त्यांच्यावर 6.84 कोटी रुपयांचे दायित्वही आहे.