Karnataka CM : कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री (Karnataka CM) कोण होणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील. तर डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) कर्नाटकचे उपमुख्यमंत्री होणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी रात्री उशिरा कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्र्यांबाबत बैठक घेतली.
बुधवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा 20 मे रोजी बंगळुरू येथे होणार आहे. याआधी बुधवारी काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री आज किंवा उद्या ठरवला जाईल आणि 72 तासांत नवीन मंत्रिमंडळ स्थापन केले जाईल.
कांतिरवा स्टेडियमवर शपथविधी होणार
सिद्धरामय्या यांच्या मूळ गावी आणि बंगळुरूमधील त्यांच्या घराबाहेर जल्लोष सुरू आहे. बंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. सिद्धरामय्या यांनी 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
सिद्धरामय्या यांच्या घरी आनंदाचे वातावरण
विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या बंगळुरू येथील शासकीय निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोष आहे. त्यांच्या नेत्याचे छायाचित्र हातात घेऊन ते सिद्धरामय्या यांचा जयजयकार करत घोषणा देत होते. त्यांच्या मूळ जिल्हा म्हैसूर आणि त्याच्या मूळ गावी सिद्धरमनाहुंडी येथेही असेच दृश्य होते. त्यांच्या समर्थकांनी आणि हितचिंतकांनी फटाके फोडले, नाचले, मिठाई वाटली.