दिल्ली : झारखंडमध्येही आघाडी सरकारमध्ये तणाव असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता काँग्रेसने प्रदेशाध्यक्षांसह आपल्या अनेक नेत्यांना मंगळवारी (5 एप्रिल) दिल्लीत येण्यास सांगितले आहे. या दरम्यान झारखंड मुक्ती मोर्चासोबत सुरू असलेल्या तणावाबाबत मोठी चर्चा होऊ शकते. काँग्रेस नेते झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर पक्षाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत असल्याचे वृत्त आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, झारखंड काँग्रेस नेत्यांना 5 एप्रिलला दिल्लीत येण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील पक्ष कोट्यातील 4 मंत्री, सर्व माजी अध्यक्ष आणि काही शाखा अध्यक्षांच्या नावांचा समावेश आहे. झारखंड काँग्रेसचे प्रमुख राजेश ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. ही बैठक पक्षाच्या मुख्यालयात होऊ शकते, असे ते म्हणाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि कोऑर्डिनेशन कमिटीच्या स्थापनेबाबत सीएम सोरेन यांना सादर केलेल्या प्रस्तावावर बराच वेळ उत्तर न मिळाल्याने काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. 7 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे, मात्र महिना उलटला तरी त्यांनी उत्तर दिलेले नाही. दुसर्या अहवालानुसार, जेएमएमने हेमंत सोरेन सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे काँग्रेसला आव्हान दिले आहे. यानंतर नवा तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे यांनी पक्षाच्या आमदारांना पुढील दोन महिने सीएम सोरेन यांची भेट न घेण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे 81 जागांवर आघाडी सरकारमध्ये 47 आमदार आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांची संख्या 30 आहे, तर काँग्रेसचे 18 आमदार आहेत. तर, राज्यात राजदचा एक आमदार आहे. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे चार मंत्री आहेत. मात्र, सोरेन यांच्यावर मित्रपक्षांकडून सातत्याने टीका होत आहे. या सरकारमध्ये काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर आता या राजकीय वादात काँग्रेसने त्यांच्या मंत्री, सर्व माजी अध्यक्ष आणि काही शाखाध्यक्षांनी दिल्लीला येण्यास सांगितले आहे. येथे होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
पराभवानंतर काँग्रेस सावध..! गुजरात-कर्नाटक मिशनची जोरदार तयारी; पहा, काय आहे काँग्रेसचा प्लान..