Jason Roy News : इंग्लंडचा स्टार फलंदाज जेसन रॉय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जेसन रॉयने एक मोठा निर्णय घेत जगातील विविध क्रिकेट लीग खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डासोबत असलेला करार संपवला आहे.
त्याच्या या निर्णयाला फ्रँचायझी क्रिकेट खेळून त्यातून मिळणाऱ्या कमाईशी जोडले जात आहे. रॉय यांच्या निर्णयावर सोशल मीडिया आणि क्रिकेट तज्ज्ञांमध्येही फूट पडली आहे. काही लोकांनी त्याला पाठिंबा दिला आहे, तर काहीजण याला देशाचा विश्वासघात असल्याचेही म्हणत आहेत.
32 वर्षीय जेसन रॉयने राष्ट्रीय संघाचा करार सोडून फक्त फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जेसन रॉय हा सध्याच्या काळातील लहान फॉरमॅटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. तो जगभरातील लीग क्रिकेटमध्ये भाग घेत आहे. आयपीएल, पीएसएल, बीपीएल यांसारख्या टी-20 लीगसाठी खेळतो.
अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) काही दिवसांत सुरू होत असताना रॉय यांनी त्यांच्या बोर्डासोबतचा करार संपुष्टात आणला आहे. या स्पर्धेत त्याने लॉस एंजेलिस नाइट रायडर्समध्ये सहभागी होण्यासाठी दोन वर्षांसाठी 03.68 कोटींचा करार केला आहे. इंग्लंड संघाने वार्षिक करारातून माघार घेण्यामागेही हेच कारण असल्याचे मानले जात आहे.
चहूबाजूंनी येणाऱ्या प्रतिक्रियांनंतर जेसन रॉय यांनी स्पष्टीकरण देणारे निवेदन जारी केले. इंग्लंडच्या राष्ट्रीय संघातून खेळणे हे त्याचे स्वप्न होते आणि हा त्याच्यासाठी सर्वात मोठा सन्मान आणि यश असल्याचे त्याने सांगितले.
रॉय म्हणला की, केंद्रीय करारातून माघार घेतल्याचा अर्थ असा नाही की तो राष्ट्रीय संघासाठी खेळणार नाही. माझे प्राधान्य अजूनही माझा देश आणि माझा संघ आहे. मी करारातून बाहेर आलो आहे पण तरीही माझे प्राधान्य इंग्लंड संघाला आहे आणि विशेषत: यंदाच्या विश्वचषकात माझे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यास उत्सुक आहे.