Israel Palestine War : हमासच्या (Hamas) अतिरेक्यांनी इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर सुरू झालेले युद्ध (Israel Palestine War)अजूनही थांबलेले नाही. दिवसेंदिवस युद्ध जास्तच चिघळत चालले आहे. या युद्धात दोन्ही बाजूंचे हजारो लोकांचा बळी गेला आहे. आपला जीव वाचविण्यासाठी लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत. तर दुसरीकडे कामानिमित्त तसेच पर्यटनासाठी गेलेले अन्य देशातील नागरिक येथेच अडकून पडले आहेत. या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतीय नागरिकही येथे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे आता भारत सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. कंट्रोल रुम सुरू करण्याचा निर्णय विदेश मंत्रालयाने घेतला आहे.
विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. युद्धाच्या परिस्थितीवर नजर ठेवणे आणि युद्धग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना सूचना आणि मदत देण्याच्या उद्देशाने कंट्रोल रुम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बागची म्हणाले. या कंट्रोल रुममध्ये चोवीस तास कामकाज सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. या व्यतिरिक्त इस्त्रायलची राजधानी तेल अवीव शहरातील भारतीय दूतावासानेही हेल्पलाइन सुरू केली आहे. तसेच एक ई मेल आयडी सुद्धा जारी करण्यात आला आहे.
या विनाशकारी युद्धात दोन्ही बाजूच्या तीन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. शहरे उद्धवस्त झाली आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे लहान मुले आणि महिला या युद्धाची सर्वाधिक किंमत मोजत आहेत. कारण, त्यांनाच या युद्धाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
भारतीय दूतावास सतर्क
इस्रायलमधील भारतीय दूतावासाने माहिती दिली की, “आम्ही इस्रायलमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांना खात्री देऊ इच्छितो की दूतावास तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी सतत कार्यरत आहे. आम्ही सर्वजण अतिशय कठीण काळातून जात आहोत. परंतु कृपया शांत राहा आणि सावध रहा आणि स्थानिक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.