Israel Hamas War : केंद्रातील मोदी सरकार इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू (Israel Hamas War) असलेल्या युद्धातून भारतीयांना त्यांच्या मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आणि सांगितले की, ऑपरेशन अजय (Operation Ajay ) अंतर्गत आतापर्यंत 5 विमानांमध्ये सुमारे 1200 भारतीय मायदेशात परतले आहेत.
पत्रकारांना संबोधित करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, ‘इस्रायल-हमास युद्धात एकाही भारतीय नागरिकाचा बळी गेल्याचे वृत्त नाही. त्यात एक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती, त्याबाबतची माहिती मागील पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. ऑपरेशन अजय अंतर्गत आतापर्यंत 1200 लोक 5 फ्लाइट्समधून भारतात आले आहेत ज्यात 18 नेपाळी नागरिक आहेत. ते पुढे म्हणाले, ‘सध्या आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. गरज भासल्यास आणखी उड्डाणे पाठवली जातील. गाझामध्ये 4 भारतीय आणि वेस्ट बँकमध्ये 12-13 लोक आहेत. गाझामधून बाहेर काढणे थोडे कठीण आहे आणि माहितीनुसार, काही लोक आधीच निघून गेले आहेत. आम्ही सर्वांच्या संपर्कात आहोत. लेबनॉनमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अद्याप कोणतीही सूचना जारी केलेली नाही.
एवढेच नाही तर गाझा रुग्णालयावरील (Gaza Hospital) हल्ल्याच्या जागतिक संतापाच्या पार्श्वभूमीवर भारताने गुरुवारी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे कठोर पालन करण्याचे आवाहन केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारताला नागरी मृत्यू आणि मानवतावादी परिस्थितीबद्दल चिंता आहे. ‘आम्ही आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे कठोर पालन करण्याचे आवाहन करतो.’ भारताने द्विपक्षीय समाधानासाठी थेट वाटाघाटींच्या बाजूने आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. गाझाच्या हॉस्पिटलमध्ये मंगळवारच्या स्फोटात सुमारे 470 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे ज्याचा आंतरराष्ट्रीय निषेध करण्यात आला आहे. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलच्या स्फोटासाठी इस्रायली हवाई हल्ल्यांना जबाबदार धरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गाझा रुग्णालयावरील हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, संघर्षात नागरीकांचा मृत्यू ही गंभीर चिंतेची बाब आहे आणि त्यात सहभागी असलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे. पीएम मोदींनी एका पोस्टमध्ये म्हटले की, ‘गाझाच्या हॉस्पिटलमधील लोकांच्या दुःखद मृत्यूमुळे खूप धक्का बसला. पीडितांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या संवेदना आहेत आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आमची इच्छा आहे.’सध्या सुरू असलेल्या संघर्षात नागरिकांची होणारी हानी ही गंभीर आणि सतत चिंतेची बाब आहे. यामध्ये संबंधितांना जबाबदार धरले पाहिजे असे मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर जमीन, हवाई आणि समुद्रातून अचानक हल्ला केल्यावर इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू झाला. हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्रायलने गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिहल्ला सुरू केला. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार संघर्ष सुरू झाल्यापासून गाझामध्ये 3,300 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि 12,000 हून अधिक जखमी झाले आहेत. इस्रायलमध्ये सुमारे 1,400 लोक ठार आणि 3,800 जखमी झाले आहेत.