Israel-Hamas War : मागच्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल आणि हमास युद्धामुळे 11 लाख पॅलेस्टिनी लोकसंख्येसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
इस्रायलने गाझा पट्टीवर जमिनीवर युद्ध लढण्याचे संकेत दिले असून सीमेवर 3 लाख 36 हजार सैनिक तैनात केले आहेत. इस्रायलने आपल्या 1.1 दशलक्ष लोकसंख्येला 24 तासांत उत्तर गाझा क्षेत्र रिकामे करण्यास सांगितले आहे. यावर संयुक्त राष्ट्रांनीही आपला आक्षेप व्यक्त केला आहे, मात्र इस्रायल सध्या तरी मागे हटण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे.
एवढ्या मोठ्या लोकसंख्येला गाझा पट्टीच्या निम्म्याएवढे क्षेत्र एका दिवसात रिकामे करणे अशक्य असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे.
गाझा पट्टीवर इस्रायलचे हवाई हल्ले तीव्र होत आहेत. आज युद्धाचा 7 वा दिवस असून आता इस्रायलने हवाई हल्ल्यांसोबतच जमिनीवर हल्ले करण्याची योजना आखली आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की गाझा पट्टीत बांधलेल्या बोगद्यांमध्ये हमासचे अतिरेकी लपले असून त्यांच्याशी सामना करण्यासाठी जमिनीवर लढा देणे आवश्यक आहे.
इस्रायलमध्ये हमासने आतापर्यंत 1300 लोक मारले असून आता इस्रायलने शनिवारपर्यंत मोठ्या हल्ल्याची योजना आखली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 247 इस्रायली सैनिकही मारले गेले आहेत. गेल्या अनेक दशकांत प्रथमच इस्रायलचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
त्याचवेळी इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात गाझामध्ये 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने गाझा पट्टीचे पाणी आणि वीजही बंद केली आहे, लोक प्रत्येक थेंबासाठी तळमळत आहेत आणि परिस्थिती अमानवी आहे.
इस्रायलचे म्हणणे आहे की त्याच्या हद्दीत घुसलेल्या हमासचे सुमारे 1500 दहशतवादीही मारले गेले आहेत. इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉन्रिकस म्हणाले की, गाझा पट्टीतून लोकांना बाहेर काढणे हे मानवतावादी पाऊल आहे. हमाससाठी निरपराध लोकांना शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा नाही. त्यामुळे आमचे आवाहन आहे की त्यांनी गाझा पट्टी सोडावी जेणेकरून केवळ हमासला लक्ष्य करता येईल.
इस्रायलने गाझा पट्टीतील लोकांना आवाहन करत हे तुमच्या सुरक्षेसाठी असल्याचे म्हटले आहे. इस्रायली लष्कराने एक नकाशाही शेअर केला आहे, ज्यामध्ये उत्तर गाझा सोडल्यानंतर तुम्ही कुठे जायचे हे सांगितले आहे.
इस्रायली लष्कराने म्हटले, ‘सीमेच्या दिशेने येऊ नका. त्याऐवजी तुम्ही लोकांनी दक्षिणेकडे जावे. वास्तविक, इस्रायली लष्कर गाझामध्ये जमिनीवर हल्ले करून हमासचे तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे.