मुंबई – इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL)पुढील सीजनची तयारी जोरात सुरू आहे. आगामी हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे. आगामी लिलाव प्रक्रियेकडे सर्व फ्रँचायझींचे लक्ष लागले आहे. 29 वर्षीय भारतीय स्टार फलंदाज केएल राहुल, ज्याची नुकतीच लिलाव प्रक्रियेपूर्वी ‘लखनौ सुपर जायंट्स’ या नवीन संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने काही आफ्रिकन खेळाडूंबाबत वक्तव्य केले आहे. आफ्रिकन दौऱ्यावरून परतल्यानंतर भारतीय फलंदाजाने तेथील काही खेळाडूंचे कौतुक केले आहे आणि आगामी हंगामात आपल्यासोबत सहभागी करुन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
‘लखनऊ सुपर जायंट्स’चा नवनियुक्त कर्णधार केएल राहुलने आफ्रिकेचा 26 वर्षीय स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचे कौतुक केले आहे. याशिवाय कोणत्याही संघाला रबाडासारखा गोलंदाज आपल्या संघात सामील करून घ्यायला आवडेल असे त्याने म्हटले आहे.
तो म्हणाला, आम्ही रबाडाला दिल्लीसाठी महत्त्वाची भूमिका बजावताना पाहिले आहे. संघाच्या विजयात त्याचा मोठा वाटा आहे. प्रत्येक संघाला रबाडासारखा खेळाडू हवा असतो. तो 145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो आणि एक हुशार क्रिकेटर आहे.
रबाडा व्यतिरिक्त, राहुलने 21 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेन आणि आफ्रिकन संघासाठी फलंदाजीत अप्रतिम कामगिरी करणाऱ्या रॅसी व्हॅन डर डुसेन यांचेही कौतुक केले आहे. राहुल म्हणाला की आम्ही कसोटी मालिकेदरम्यान ड्रेसिंग रूममध्ये जॅन्सेनबद्दल बोललो होतो.
जॅनसेनने मुंबईसाठी काही सामने खेळले आहेत, पण आता त्याची प्रतिभा समोर येत आहे. कसोटी फॉर्मेटमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर लोकांचा त्याच्याबद्दलचा समज बदलत आहे. आगामी काळात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना दिसणार आहे. मालिका संपल्यानंतरही आम्ही त्याच्याबद्दल बोललो. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वेगळ्या अध्यायाकडे वाटचाल करत आहे.
राहुलचा या खेळाडूंकडे असलेला कल पाहता लखनऊचा संघ या खेळाडूंना आपल्या संघात सामावून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो. फ्रँचायझीच्या पर्समध्येही चांगली रक्कम शिल्लक आहे. राहुल व्यतिरिक्त लखनऊ संघाने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि युवा भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांचा लिलावापूर्वी आपल्या संघात समावेश केला आहे.