RR vs CSK : IPL 2023 चा 37 वा सामना जयपूर येथे खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला ( RR vs CSK) राजस्थान रॉयल्सकडून (RR) 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 ओव्हर्समध्ये 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला केवळ 170 धावा करता आल्या आणि सामना गमवावा लागला.
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. ऋतुराज गायकवाड आणि कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 6 ओव्हरमध्ये 42 धावांची भागीदारी केली. कॉनवे विशेष काही करू शकला नाही आणि तो 8 धावा करून बाद झाला. गायकवाडने 48 धावा केल्या. अजिंक्य रहाणेनेही 15 धावा केल्या. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेला अंबाती रायुडू खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
शिवम दुबेने लढत दिली
यानंतर शिवम दुबेने वेगवान धावसंख्या सुरू केली, मात्र ही भागीदारी फार काळ टिकू शकली नाही. शिवम दुबेने एका टोकाला सांभाळत आपले अर्धशतक पूर्ण केले. शिवमने 52 धावांची खेळी खेळली आणि 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. जडेजाने नाबाद 23 धावा केल्या. अॅडम झाम्पाने तीन, अश्विनने दोन आणि कुलदीप यादवने एक विकेट घेतली.
यशस्वी जैस्वालची झंझावाती खेळी
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत राजस्थानने दमदार सुरुवात केली. जैस्वाल आणि बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. जोस बटलर 27 धावा करून बाद झाला. जैस्वालने 77 धावांची खेळी केली. संजू सॅमसन 17 धावा करून बाद झाला. देवदत्त पडिक्कल आणि जुरेल यांनी अखेरच्या क्षणी झटपट धावा केल्या. पडिक्कल 23 धावा करून नाबाद राहिला. जुरेल अखेरच्या ओव्हरमध्ये 34 धावा काढून धावबाद झाला. चेन्नईकडून तुषार देशपांडेने दोन बळी घेतले.