Mohit Sharma in IPL : गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने (Mohit Sharma in IPL) सोमवारी आयपीएल 2023 च्या 44 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एक विशेष कामगिरी केली. मोहित शर्माने रिपल पटेलला बाद केले आणि त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 100 विकेट्स पूर्ण केल्या.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मोहित शर्माने अप्रतिम गोलंदाजी केली. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने चार ओव्हरमध्ये 33 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. त्याने प्रथम अक्षर पटेल नंतर रिपल पटेलला बाद करत शंभरावी विकेट घेतली.
मोहित शर्माने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने 92 व्या सामन्यात आयपीएलमधील 100 बळी पूर्ण केले. तसे पाहता, 100 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा मोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील 23 वा गोलंदाज ठरला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जचा माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. ब्राव्होने 161 सामन्यात 183 विकेट घेतल्या. भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर आहे. चहलने 140 सामन्यात 178 विकेट घेतल्या.
मोहित शर्माचे आयपीएलमधील पुनरागमन संस्मरणीय ठरले आहे. 34 वर्षीय मोहित शर्माने गेल्या वर्षी गुजरात टायटन्ससाठी नेट बॉलरची भूमिका बजावली होती. गुजरातचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराने मोहित शर्माला विचारले की त्याला बदली म्हणून समाविष्ट केले जाऊ शकते का, ज्याला वेगवान गोलंदाज सहमत झाला. यश दयालच्या जागी मोहित शर्माला संधी मिळाली आणि त्याने दोन विकेट घेत आपले पुनरागमन सार्थ ठरवले. यानंतर मोहित शर्माने चांगली कामगिरी करत चाहत्यांना प्रभावित केले.