Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये, गुरुवारी राजस्थानने KKR चा 9 गडी राखून पराभव केला आणि पॉइंट टेबलमध्ये पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. विजयासाठी 150 धावांचा पाठलाग करताना डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल (नाबाद 98) याने तुफान खेळी केली.
जैस्वालने आपल्या धडाकेबाज कामगिरीने केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई करत सामना एकतर्फी केला. दुसऱ्या बाजूला जोस बटलर (0) स्वस्तात बाद झाला. पण त्याचा जयस्वालच्या मूडवर अजिबात परिणाम झाला नाही. डाव्या हाताच्या फलंदाजाने केकेआरच्या गोलंदाजांना झोडपून काढले.
केकेआरने मानसिकदृष्ट्या खूप आधी पराभव स्वीकारला होता. परिणामी राजस्थान रॉयल्सने केवळ 13.1 ओव्हरमध्ये विजय साकार केला. यासह, मागील सहा सामन्यांपैकी 5 सामने गमावल्यानंतर रॉयल्सने जोरदार पुनरागमन केले आणि पुन्हा गुणतालिकेत तीन नंबरचा संघ बनला.
पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना नाइट रायडर्सने राजस्थानसमोर विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य ठेवले. राजस्थानला प्रथम फलंदाजीला आल्यानंतर केकेआरचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. पण इथून थोड्याशा संथ खेळपट्टीवर व्यंकटेश अय्यरने (५७) एका टोकाला चांगली खेळी केली. त्याला कर्णधार नितीश राणा (22) यांनीही साथ देण्याचा प्रयत्न केला. केकेआरच्या समर्थकांना आणखी धावांची अपेक्षा होती पण, चहलच्या चार विकेट्सने केकेआरला खूप आधी रोखले.
चहलची जादू अशी चालली की केकेआरच्या विकेट्स ठराविक अंतराने पडत गेल्या. त्यामुळे कोलकाता संघाला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 149 धावाच करता आल्या. ही धावसंख्या यशस्वी जैस्वालच्या जोरदार हल्ल्यांमुळे कमी पडली.