IPL 2023 क्रिकेट स्पर्धा आजपासून मोठ्या दिमाखात सुरू झाल्या. या स्पर्धा जगभरात लोकप्रिय ठरल्या आहेत. देश विदेशातील खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होतात. या स्पर्धेत अनेकदा वादही होत असतात. पण हे वाद असूनही आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. असे अनेक वादही या लीगमध्ये चव्हाट्यावर आले ज्यामुळे ही स्पर्धा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली.
हरभजनची चपराक
आयपीएलच्या पहिल्या सत्रात एस श्रीशांत आणि हरभजन यांच्यातील शाब्दिक वाद क्वचितच कोणी क्रिकेट चाहते विसरले असतील. किंग्ज इलेव्हन पंजाबचा वेगवान गोलंदाज श्रीसंतला मैदानातच मुंबई इंडियन्सचा खेळाडू हरभजन सिंगने चपराक लगावली होती. यासाठी त्याच्यावर 11 सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.

स्पॉट फिक्सिंग
2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगची बाब समोर आली होती. यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी राजस्थानचे तीन खेळाडू एस श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांनाही अटक केली होती. हे दोन्ही संघ आयपीएलच्या नवव्या आणि दहाव्या हंगामात खेळले नाहीत. नवव्या आणि दहाव्या हंगामात त्यांची जागा गुजरात लायन्स आणि पुणे सुपरजायंट्सने घेतली होती.
शेन वॉर्नची शिवीगाळ
2011 मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्नने आरसीबीकडून सामना हरल्यानंतर राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय दीक्षित यांना जाहीरपणे शिवीगाळ केली होती. यानंतर संजयने शेन वॉर्नविरोधात एफआयआरही दाखल केला होता.
रेव्ह पार्टीमध्ये पकडले खेळाडू
2012 च्या आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सचे दोन खेळाडू राहुल शर्मा आणि वेन पारनेल यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. हे दोन्ही खेळाडू एका रेव्ह पार्टीत पकडले गेले. आयपीएलच्या नियमांनुसार स्पर्धेदरम्यान अशा कोणत्याही ठिकाणी जाणे बेकायदेशीर आहे.

पोलार्ड आणि गेल वाद
एका सामन्यादरम्यान किरॉन पोलार्डचा ख्रिस गेलसोबत वाद झाला. अंपायरने हस्तक्षेप करत पोलार्डला तोंड बंद ठेवण्यास सांगितले. यानंतर पोलार्डने तोंडावर टेप लावून मैदानात प्रवेश केला ज्याने सर्व प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते.
विराट गंभीरशी भिडला
2013 साली आयपीएल दरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर यांच्यात मैदानावर जोरदार वादावादी झाली होती. कोहलीने प्रदीप संगवानला लागोपाठ दोन षटकार मारले होते आणि तो तिसरा षटकार मारणार होता. मात्र तिसऱ्या षटकाराच्या प्रयत्नात कोहलीची विकेट गेली. यानंतर केकेआरच्या खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. बाद झाल्यानंतर कोहली पॅव्हेलियनमध्ये परतत असताना गौतम गंभीरसोबत त्याचे वाद झाले. त्यानंतर अंपायरने दोघांमधील प्रकरण शांत केले. या भांडणामुळे दोन्ही खेळाडूंवर अभद्र भाषा आणि अयोग्य हावभावचा आरोप लावण्यात आला.
स्टॉर्कची पोलार्डशी टक्कर
आयपीएल 2014 मध्ये किरॉन पोलार्ड आणि मिचेल स्टार्क यांच्यात वाद झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याच्या 17 व्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या मिचेल स्टार्कने किरॉन पोलार्डवर जबरदस्त बाऊन्सर फेकला. या बाऊन्सरने पोलार्ड पूर्णपणे चुकला. यानंतर स्टार्कने पोलार्डला टोमणा मारला. त्याने लगेच उत्तर दिले.

त्याचवेळी स्टार्क पुढचा चेंडू टाकायला आला तेव्हा पोलार्ड क्रीझच्या बाहेर गेला. असे असतानाही त्याने चेंडू फेकला, त्यानंतर पोलार्डनेही त्याची बॅट स्टार्कच्या दिशेने फेकली. हे प्रकरण शांत करण्यासाठी ख्रिस गेलला यावे लागले. पोलार्डने याबाबत पंचांकडे तक्रारही केली. या वादामुळे पोलार्डला त्याच्या मॅच फीच्या 75 टक्के तर स्टार्कला 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
रियान पराग आणि हर्षल पटेल वाद
26 एप्रिल रोजी आयपीएल 2022 मध्ये राजस्थान आणि आरसीबी दुसऱ्यांदा भिडले तेव्हा रियान पराग आणि हर्षल पटेल आमनेसामने आले. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर हर्षल पटेल बाद झाला. 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ 19.3 ओव्हर्समध्ये 115 धावांवर बाद झाला. कुलदीप सेनच्या गोलंदाजीवर हर्षल पटेलला परागने झेलबाद केले.
सामना जिंकल्यानंतर तो उत्साहात हर्षलशी भिडला. राजस्थान आणि आरसीबीच्या इतर खेळाडूंनी दोघांना वेगळे केले. सामना संपल्यानंतर हर्षलने रियानशी हस्तांदोलनही केले नाही.

पंतने आपल्या फलंदाजांना माघारी बोलावले
आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात दिल्लीला विजयासाठी शेवटच्या षटकात 36 धावा करायच्या होत्या. रोव्हमन पॉवेलने ओबेड मॅकॉयच्या ओव्हरमधील पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. तिसरा चेंडू फुलटॉस होता. पॉवेलला वाटले की तो नो-बॉल द्यायला हवा होता.

पॉवेलने अपील केले, पण मैदानावरील पंचांनी नो-बॉल म्हटले. यामुळे डगआउटमध्ये बसलेला दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत संतापला आणि त्याने दोन्ही फलंदाजांना बाहेर येण्याचे संकेत दिले. त्यानंतर त्यांनी सहाय्यक प्रशिक्षकाला मैदानाच्या आत पाठवले. पंचांनी समजावून परत पाठवले. दिल्लीचा संघ 15 धावांनी पराभूत झाला.