IPL : भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरबाबत (Shreyas Iyer) मोठी बातमी समोर आली आहे. अय्यरला पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे आणि या कारणामुळे तो आयपीएल 2023 (IPL) आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून बाहेर राहणार आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जूनमध्ये ओव्हल येथे होणार आहे.
ESPNcricinfo नुसार, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला शस्त्रक्रियेसाठी परदेशात जावे लागेल आणि प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यापूर्वी किमान तीन महिने क्रिकेटमधून बाहेर राहावे लागेल. श्रेयस अय्यरला पाठीच्या दुखण्यामुळे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीतून बाहेर पडावे लागले होते.
त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी होऊ शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून श्रेयस अय्यर या दुखापतीने त्रस्त आहे. भारताच्या बांगलादेश दौऱ्यानंतर तो न्यूझीलँडविरुद्धच्या मालिकेत सहभागी होऊ शकला नाही. श्रेयस अय्यरच्या या दुखापतीमुळे भारतीय संघ व्यवस्थापन आणि त्याचे चाहते नक्कीच निराश होतील. कारण त्याने मधल्या फळीतील कामगिरीने प्रभावित केले होते आणि संघाला स्थिरता प्रदान केली होती.
कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत नितीश राणाला अंतरिम कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. केकेआरसाठी दोन दिवसांतील ही दुसरी वाईट बातमी आहे. अलीकडेच बांगलादेशचा कर्णधारानेही आयपीएल 2023 मधून आपले नाव मागे घेतले आहे. बांगलादेशच्या कर्णधाराने KKR अधिकाऱ्यांना IPL 2023 मधून बाहेर पडण्याच्या निर्णयाबद्दल कळवले आहे.
आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सची सुरुवात खराब झाली. डकवर्थ लुईस पद्धतीच्या आधारे मोहालीत पंजाब किंग्जकडून केकेआरचा सात धावांनी पराभव झाला. आता KKR चा पुढचा सामना गुरुवारी ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. केकेआर आपल्या घरच्या मैदानावर विजयाचे खाते उघडण्याचा प्रयत्न करेल.