IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेटचा थरार शिगेला पोहोचला आहे. बऱ्याच वर्षांनंतर आयपीएल होम अवे फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. कोरोनामुळे (Corona) ही स्पर्धा मर्यादित ठिकाणीच खेळवली जात होती. गेल्या वर्षी स्पर्धेमध्ये दोन नवीन संघ सहभागी झाल्यानंतर उत्साह वाढला आहे. यावेळी पॉइंट टेबलमध्ये (IPL Point Table) सातत्याने बदल होत आहेत. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) अव्वल स्थानावर कायम असून त्यांनी प्लेऑफचे तिकीटावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) दुसऱ्या तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर हैदराबाद आणि दिल्ली प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत.
52 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 72 सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी 18 डबल हेडर असतील. दुहेरी हेडरचा सामना म्हणजे एक सामना दुपारी आणि दुसरा संध्याकाळी खेळला जाईल. हे सर्व सामने 12 वेगवेगळ्या स्टेडियममध्ये खेळवले जातील. या दरम्यान प्रत्येक संघ 14-14 सामने खेळेल. ज्यामध्ये 7 होम आणि 7 अवे सामने होतील.
सध्या पॉइंट टेबलमध्यये गुजरात टायटन्स 18 गुणांसह आघाडीवर आहे. तर चेन्नई सुपर किंग्स 15, मुंबई इंडियन्स 14, लखनौ सुपर जायंट्स 13, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 12, राजस्थान रॉयल्स 12, पंजाब किंग्स 12, सनरायजर्स हैदराबाद 8 आणि दिल्ली कॅपिटल्स 8 गुणांसह सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत.
गतवर्षीप्रमाणे यंदाही संघांची प्रत्येकी पाच जणांच्या दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आहेत, तर ब गटात चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आहेत. सर्व संघ आपापल्या गटातील इतर चार संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील. तर इतर गटातील कोणत्याही एका संघाविरुद्ध दोन सामने आणि इतर ४ संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळवला जाईल.
गुणतालिकेत अव्वल 4 मध्ये पोहोचणाऱ्या संघांना प्लेऑफ फेरीत स्थान मिळेल. जे संघ साखळी फेरीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असतील ते पहिल्या क्वालिफायरमध्ये भिडतील. त्यात जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल. पराभूत संघाला एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी टक्कर देऊन अंतिम फेरी गाठण्याची दुसरी संधी मिळेल.
एलिमिनेटर सामन्यात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांमध्ये लढत होईल. पराभूत संघाचा प्रवास तिथेच संपेल आणि विजेत्या संघाचा पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभूत संघाशी सामना होईल. या सामन्याला क्वालिफायर टू म्हणतात. यानंतर विजेतेपद पटकावणारा संघ विजेतेपदाच्या लढतीत निश्चित होईल.