IPL : महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने धडाकेबाज खेळ करत गुजरात टायटन्सला धक्का (CSK beat GT) दिला. हार्दिक पांड्याच्या (Gujarat Titans) गुजरात टायटन्स संघाचा मंगळवारी चेन्नईने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. चेन्नईने 173 रन्सचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा अख्खा संघ 157 रनांवरच आटोपला.
गुजरात टायटन्स संघाला आयपीएलमध्ये पहिल्यांदाच चेन्नईच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. चार वेळेस आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईने दहाव्या वेळेस फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातकडे अजून एक संधी आहे. क्वॉलिफायर -2 मध्ये एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाविरुद्ध गुजरातचा सामना होईल.
नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईने चांगली सुरूवात केली. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 87 रनांची भागीदारी केली. गायकवाडला नो बॉलमुळे एक संधी मिळाली. ज्याचा त्याने भरपूर फायदा घेतला. गायकवाडने 44 चेंडूत 60 रन केले. कॉनवेने 34 चेंडूत 40 रन केले. यानंतर आलेल्या शिवम दुबे मात्र काही करू शकला नाही. अजिंक्य रहाणे (17), अंबाती रायडू (17) या दोघांनी वेगवान खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात दोघे अपयशी ठरले. रवींद्र जडेजाने 22 रन केले. एमएस धोनीने फक्त एक रन केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. ऋद्धीमान साहा 12 रन करून बाद झाला. शुभमन गिल बराच वेळ क्रिजवर होता मात्र त्याने संथगतीने रन केले. त्याने 38 चेंडूत 42 रन केले. हार्दिक पांड्या (8), डेविड मिलर (4), राहुल तेवतिया (3) विशेष काही करू शकले नाहीत. दासुन शनाका याने 17 रन केले. तर राशिद खानने 30 रन केले. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. संघाचे 6 विकेट 100 रन्सच्या आतच पडले होते.
चेन्नईकडून दीपक चाहर, महेश तीक्षणा, रवींद्र जडेजा आणि पथिराना यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे याला एक विकेट मिळाली. गुजरातचा एक खेळाडू धावपबाद झाला.