IPL 2023 Playoffs BCCI Initiative : आयपीएलमध्ये (IPL 2023) आता पहिल्या टप्प्यातील सामने संपल्यानंतर प्ले ऑफमधील सामने सुरू झाले आहेत. पहिल्या क्वालिफायर सामन्यात चार वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्सने (CSK) गतविजेत्या गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश केला.
या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ आणि मुंबई आमनेसामने आहेत. या स्पर्धेत आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल प्लेऑफ सामन्यांदरम्यान प्रत्येक डॉट बॉलवर 500 झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील एलिमिनेटर सामन्यादरम्यान डॉट बॉलच्या एकूण संख्येने 100 चा टप्पा पार केला. यानंतर आता बीसीसीआय 50,000 हून अधिक झाडे लावणार आहे.
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात एकूण 84 चेंडू डॉट टाकण्यात आले. यानंतर लागवड करायच्या एकूण झाडांची संख्या 42,000 वर पोहोचली. CSK संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) या सामन्यात सर्वाधिक 12 डॉट बॉल फेकले. BCCI चा हा उपक्रम प्लेऑफ सामन्यांदरम्यान उघड झाला जेव्हा लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान डॉट बॉल दाखवण्यासाठी ट्री इमोजीचा वापर करण्यात आला.
बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनीही आपल्या ट्विटद्वारे या उपक्रमाची माहिती दिली. यामध्ये त्याने आपल्या ट्विटमध्ये असेही नमूद केले आहे की, कोण म्हणतो की टी-20 हा फक्त फलंदाजांचा खेळ आहे पण तो गोलंदाजांचाही आहे. या सर्व गोष्टी फक्त तुमच्या हातात आहेत.