IND vs ZIM : आशिया चषकाआधी (Asia Cup) भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये (Zimbabwe) तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. सन 2016 नंतर भारताचा हा पहिलाच झिम्बाब्वे दौरा असेल. गेल्या काही काळापासून भारताने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे परंतु तरीही झिम्बाब्वेचा फलंदाज इनोसेंट काया (Innocent Kaia) याने या मालिकेबाबत भविष्यवाणी केली आहे. त्याने असे म्हटले आहे, की या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वेचा संघ मोठा उलटफेर करेल.
1992 पासून भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये 13 वेळा खेळला आहे. झिम्बाब्वेचा संघ फक्त दोन सामने जिंकू शकला आहे. तर भारताने 2001 पासून एकही सामना गमावलेला नाही. भारताच्या विजयात 2013, 2015 आणि 2016 मध्ये एकदिवसीय मालिकेत विजयाबरोबरच भारताने या देशात दोन टी-20 मालिका आणि एक कसोटी मालिकाही जिंकली आहे. ही आकडेवारी असूनही, इनोसंटने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की झिम्बाब्वे मालिका 2-1 ने जिंकेल आणि मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनण्याचे त्याचे वैयक्तिक लक्ष्य आहे.
तो पुढे म्हणाला, की आम्ही मालिका जिंकत आहोत. वैयक्तिक अपेक्षांनुसार मला सर्वाधिक रन आणि शतक करायचे आहे. तेच माझे ध्येय आहे. झिम्बाब्वेने बांगलादेशविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली. या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) यांना विश्रांती देण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) आणि उपकर्णधार शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) असणार आहे.