India’s next PM असेल ‘तो’ नेता..! पहा गणितावर कसे बदलणार नेतृत्व

India’s next PM  : सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज पूर्ण होऊन पुढील आठवड्यात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष किती जागा मिळवणार आणि कोण देशाचा पुढील पंतप्रधान होणार यावरून चर्चा झडत आहेत.

भाजपप्रणीत युतीला टक्कर देत काँग्रेस पक्षाने यंदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची मोट बांधून जोरदार टक्कर दिली आहे. त्यामुळे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी यंदा दुसरेच कोणीतरी या पदावर येण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली आहे. मात्र, नवीन पंतप्रधान हे भाजपचे असतील की इतर कोणत्या पक्षाचे हे अखेरीस आता मंगळवारच्या मतमोजणी नंतर स्पष्ट होईल. त्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.

यंदा ४०० पार नारा देत पुन्हा सत्तासोपण चढण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि टीम अमित शाह यांचा भाजप अतुर आहेत. मात्र, त्यांचा दहा वर्षांचा विजयी वारू यंदा ब्रेक लागण्याच्या शक्यतेने चर्चेत आहे. अशावेळी भाजप आणि मित्रपक्षाच्या एकूण जागा कमी जागा आल्यास भाजप एखादा नवीन भिडू पुढे करून सत्ता मिळवणार तर नाही ना अशीही शंका व्यक्त होत आहे. अशावेळी नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांची लॉटरी लागेल असे म्हटले जात आहे.

मात्र, तरीही एकूण मतमोजणीत भाजपला २२५ पेक्षा कमी आणि एकूण भाजपा आघाडीला २५० च्या आत जागा मिळाल्या तर अखेर देशात सत्तांतर होईल अशीही काहींना खात्री वाटत आहे. अशावेळी काँग्रेस पक्षाने फक्त १२५+ जागा मिळवल्या आणि त्यांच्या इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांनी १५०+ जागा मिळवत २७२ चा जादुई आकडा पार केला तर कोण पंतप्रधान होणार याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. हिंदी न्युज चॅनल यांच्या युट्यूबवर सध्या कॉमेंट पाहिल्या तर राहुल गांधी यांची बऱ्यापैकी हवा असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, भाजपने जर आताच्या जागा टिकवल्या तर मात्र इतरांना संधी मिळणार नाही असेच म्हटले जात आहे.

अशावेळी भाजपकडून सध्या चर्चेतील मुख्य चेहरा अखेर नरेंद्र मोदी हेच आहेत. तर इतर पर्याय म्हणून अमित शाह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांचीच नावे चर्चेत आहेत. तर, इंडिया आघाडीकडून राहुल गांधी, मल्लिकर्जून खर्गे, शरद पवार किंवा ऐनवेळी एखादा डार्क हॉर्स म्हणून अर्थतज्ज्ञ किंवा वेगळाच महत्त्वाचा आणि जगप्रसिद्ध चेहरा पंतप्रधान असेल असे म्हटले जात आहे.

मात्र, या सर्व चर्चा आणि अंदाज असून मतमोजणीत देशाचा कौल कोणाला मिळणार आणि कोण कशा पद्धतीने आघाडी वा युतीची मोट बांधणार यावर या मुख्य पदाचे गणित आणि चेहरा स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment