Indian Railway : जेव्हा आपण रेल्वे स्टेशनवर जातो (Indian Railway) तेव्हा अनेक वेळा आपण तिकिटाशिवाय प्रवेश करतो, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या देशात एक असे रेल्वेस्थानक आहे जिथे लोकांना पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय प्रवेश दिला जात नाही. आता तुम्ही विचार करत असाल की जर परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट (Passport) आणि व्हिसा (Visa) आवश्यक असेल तर रेल्वे स्टेशनमध्ये जाण्यासाठी या दोन गोष्टी कशासाठी आवश्यक आहेत. पण, या रेल्वे स्टेशनवर जायचे असेल तर व्हिसा आणि पासपोर्टशिवाय जाऊ शकत नाही. एवढेच नाही तर या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला शिक्षाही होऊ शकते.
पंजाब राज्यातील अटारी रेल्वे (Atari Railway Station) स्टेशन हे एकमेव स्थानक आहे जिथे पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय प्रवेश दिला जात नाही. अटारी रेल्वे स्थानक अमृतसर (Amritsar) जिल्ह्यात आहे. कारण इथून पाकिस्तानला (Pakistan) ट्रेन जातात. त्यामुळे पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय येथे प्रवेश करता येत नाही. भारतातील हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे जिथे पासपोर्ट आणि व्हिसा दोन्ही आवश्यक आहेत. या रेल्वे स्थानकावर सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अटारी रेल्वे स्थानकावर व्हिसा आणि पासपोर्टशिवाय पकडल्यास 14 फॉरेन अॅक्ट कायद्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार आंतरराष्ट्रीय हद्दीत आवश्यक कागदपत्रांशिवाय पकडले गेल्यास गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर एकदा अटक केल्यानंतर जामीन मिळण्यास अनेक वर्षे लागू शकतात.
दिल्ली आणि अमृतसरहून पाकिस्तानातील लाहोरला जाणाऱ्या रेल्वे या रेल्वे स्थानकावरून जातात. ही ट्रेन भारत आणि पाकिस्तान दरम्यान नागरिकांसाठी वेळोवेळी चालवली जाते. त्यापैकी समझौता एक्सप्रेस देखील एक आहे. मात्र, गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेल्या संबंधांमुळे या रेल्वेचे कामकाज सध्या बंद आहे.
अटारी रेल्वे स्थानकावर अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही झाले आहे. याशिवाय गुप्तचर यंत्रणा येथे 24 तास पाळत ठेवते. या स्थानकात पोर्टर्सही येऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना स्वतःचे सामान घेऊन जावे लागते. पाकिस्तान सीमेपासून जवळ असल्याने या स्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. अटारी रेल्वे स्थानकावरून ट्रेनला कोणत्याही कारणामुळे उशीर झाल्यास त्याची नोंद भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या रजिस्टरमध्ये केली जाते.