यूपी निवडणूक : ‘मी एक मुलगी आहे… मी लढू शकते’.. कोणत्या पक्षाने दिली महिलांना अशी हाक
नवी दिल्ली : पुढील वर्षी उत्तर प्रदेशची निवडणूक असून आतापासूनच सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी सर्वच पक्ष सरसावले आहेत.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी लखनौ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट, प्रमोद तिवारी, आराधना मिश्रा मोना, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू, आचार्य प्रमोद कृष्णन आणि नसीमुद्दीन सिद्दीकी उपस्थित होते.
यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या, उत्तर प्रदेश निवडणुकीत आम्ही महिलांना 40 टक्के तिकिटे (उमेदवार) देणार आहोत. महिलांनी राजकारणात पुढे यावे. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात महिलांचा सहभाग वाढेल. हा निर्णय सामान्य महिलांसाठी आहे. हा निर्णय प्रयागराजच्या पारोसाठी आहे. हा निर्णय चंदौलीच्या मुलीसाठी आहे. हा निर्णय उन्नावच्या मुलीसाठी आहे. हा निर्णय रमेश चंद्रा यांच्या मुलीसाठी आहे, असे त्यांनी सांगितले.
‘मी एक मुलगी आहे… मी लढू शकते’, अशी घोषणा यावेळी प्रियंका गांधी यांनी दिली. यूपीमध्ये बदलाचे स्वप्न पूर्ण होईल. देशाला विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी.सहभागी होण्यासाठी महिलांनी पुढे यावे. महिलांनी स्वतःचे रक्षण करावे. माझा निर्णय यूपीच्या प्रत्येक महिलेसाठी आहे. काँग्रेस पूर्ण क्षमतेने रस्त्यावर सरकारशी लढत आहे. राजकारणात बदलासाठी संघर्ष आवश्यक आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी तिकिटांमध्ये आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मी अशा लोकांसाठी लढत आहे जे आवाज उठवू शकत नाहीत. आवाज उठवणाऱ्यांना चिरडले जात आहे. माझे राजकारण परिस्थिती बदलणे आहे. आज उत्तर प्रदेशात हत्या आणि चिरडण्याचे राजकारण होत आहे, अशी टीका त्यांनी केली.