मुंबई – ICC ने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. पुन्हा एकदा भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी (India vs Pakistan) होणार आहे. याआधी 2021 च्या टी-20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला होता. 2022 मध्ये हे दोन्ही संघ 23 ऑक्टोबरला आमने-सामने येतील. यानंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध खेळावे लागणार आहे. भारताला ग्रुप स्टेजमध्ये एकूण पाच सामने खेळावे लागणार आहेत. यापैकी भारताला पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेकडून कडवे आव्हान मिळू शकते. याशिवाय बाकीचे सामने थोडे कमकुवत संघाशी होणार आहे.
भारताच्या गटात सध्या दोन संघ रिक्त असून पात्रता फेरीतील विजयी संघांना या गटात खेळण्याची संधी मिळणार आहे. मात्र, आयसीसीच्या सामन्यांचा विचार करता भारताच्या गटात नामिबिया आणि वेस्ट इंडिजच्या संघांचा समावेश होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळावा लागू शकतो. असे झाले तर या सामन्यातही टीम इंडियाला सावध राहावे लागेल.
आयसीसीने या स्पर्धेच्या फिक्स्चरमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि यावेळीही सर्व संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटातील सहा संघ आमनेसामने येणार असून गटातील अव्वल दोन संघांना उपांत्य फेरीचे सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.
भारताचे T20 विश्वचषक 2022 चे वेळापत्रक
पहिला सामना: भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर, मेलबर्न
दुसरा सामना: भारत विरुद्ध अ गट उपविजेता, 27 ऑक्टोबर, सिडनी
तिसरा सामना: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 ऑक्टोबर, पर्थ
चौथा सामना: भारत विरुद्ध बांगलादेश, 2 नोव्हेंबर, अॅडलेड
पाचवा सामना : भारत विरुद्ध ब गट, मेलबर्न.