नवी दिल्ली : ड्रोन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार ICAR संस्था कृषी विज्ञान केंद्र (KVKs) आणि राज्य कृषी विद्यापीठांना 10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देणार आहे.
एका अधिकृत निवेदनानुसार, या निर्णयामुळे दर्जेदार शेतीला चालना मिळेल आणि ड्रोनचे देशांतर्गत उत्पादन वाढण्यासही मदत होईल. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने या क्षेत्रातील भागधारकांना ड्रोन तंत्रज्ञान परवडणारे बनविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
निवेदनानुसार, सब मिशन ऑन अॅग्रिकल्चरल मेकॅनायझेशन (SMAM) च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये कृषी ड्रोनच्या किमतीच्या 100 टक्के किंवा 10 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान म्हणून दिले जाईल.
मंत्रालयाने सांगितले की, ही रक्कम कृषी यंत्रसामग्री प्रशिक्षण आणि चाचणी संस्था, ICAR संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि राज्य कृषी विद्यापीठांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान म्हणून दिली जाईल.
ड्रोनच्या साहाय्याने पिकावर फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक नुकतेच शेवगाव तालुकयातील दहिगावने येथील कृषी विज्ञान केंद्रात झाले होते. विशेषतः फळबाग, ऊस यावर फवारणीसाठी याचा उपयोग करता येतो.
याबाबतच्या अधिक संशोधनासाठी आता कृषी विज्ञान केंद्रामध्ये केंद्र सरकारकडून ड्रोनसाठी निधी दिला जाणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. असे ड्रोन शेतकरी गट, शेतकरी उत्पदाक कंपन्याही विकत घेऊ शकतात.