नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 9 टक्क्यांवर आणला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयएमएफने भारताचा विकास दर 9.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. IMF ने म्हटले आहे, की जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर 2021 मध्ये 5.9 टक्क्यांवरून 2022 मध्ये 4.4 टक्क्यांपर्यंत घसरेल. आयएमएफचा ताजा अंदाज केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (सीएसओ) 9.2 टक्के आणि रिजर्व बँकेच्या चालू आर्थिक वर्षातील 9.5 टक्के अंदाजापेक्षा कमी आहे. याशिवाय हा अंदाज S&P च्या 9.5 टक्के आणि मूडीजच्या 9.3 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
याआधी संयुक्त राष्ट्रांनी म्हटले होते, की आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने वाढेल. मात्र, भारताचा आर्थिक विकास अचानक थांबण्याचा इशाराही दिला होता. कोळशाची टंचाई आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आगामी काळात भारताच्या आर्थिक घडामोडींमध्ये अडचणी येऊ शकतात, असे संयुक्त राष्ट्रांच्या वतीने सांगण्यात आले होते. पुढील वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत आशियाई देशांचा दबदबा राहणार असून अमेरिका, ब्रिटेन सारख्या विकसित देशांनाही हे देश मागे टाकतील असा अंदाज काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला होता.
सन 2022 मध्ये जागतिक आर्थिक उत्पादन 100 ट्रिलियन डॉलरच्या पुढे जाईल. यावेळी भारत फ्रान्सला मागे टाकत सहावा क्रमांक मिळवेल. यानंतर भारत 2023 मध्ये ब्रिटनला मागे टाकेल आणि 2031 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च (CEBR) च्या अहवालात हा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता संयुक्त राष्ट्रांनीही आगामी काळात भारताचा विकास दर वाढणार असल्याचे म्हटले आहे.
सीईबीआरच्या अहवालात असेही म्हटले होते, की अमेरिकेला मागे टाकण्यासाठी चीनला पूर्वीच्या अंदाजापेक्षा दोन वर्षे जास्त लागतील. 2028 पर्यंत चीन अमेरिकेला मागे टाकून जगातील नंबर 1 अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. आता यामध्ये 2030 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सन 2033 मध्ये आर्थिक उत्पादनात जर्मनी जपानला मागे टाकेल. इंडोनेशिया 2034 पर्यंत 9 व्या क्रमांकावर जाऊ शकतो आणि सन 2036 पर्यंत रशिया पहिल्या 10 अर्थव्यवस्थांमध्ये असेल.
वाव.. नव्या वर्षात भारत राहणार आघाडीवर, जग मात्र राहणार मागे; पहा, कुणी व्यक्त केलाय ‘हा’ अंदाज