India : भारताचे (India) परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी पुन्हा एकदा चीनसोबतच्या (China) संबंधांवर चिंता व्यक्त केली आहे. चीन सीमा कराराचा आदर करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर गलवान खोऱ्यातील चकमकीचा परिणाम अजूनही दोन्ही देशांच्या संबंधांवर असल्याचेही त्यांनी सांगितले. ब्राझीलमधील (Brazil) साओ पाउलो येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारताचे परराष्ट्र मंत्री बोलत होते. सध्या ते ब्राझील, पॅराग्वे आणि अर्जेंटिना दौऱ्यावर आहे. यादरम्यान त्यांनी ब्राझीलमधील भारतीय समुदायातील लोकांची भेट घेतली.
एस जयशंकर म्हणाले की, आम्ही 1990 मध्ये चीनसोबत करार (Resolution) केला होता. त्यानुसार सीमा भागात सैन्य आणण्यास मनाई आहे, मात्र चीन त्याचे पालन करत नाही. गलवान व्हॅलीमध्ये काय झाले ते तुम्ही सर्वांनी पाहिले आहे, तिथं घडलेल्या घटनेमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम झाला आहे. भारत आणि चीनच्या सीमेवरील सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, टाळी फक्त एका हाताने वाजत नाही. यासाठी दोन्ही बाजूंनी नाते (Relation) टिकून राहणे आवश्यक आहे. यावेळी एस जयशंकर यांनी भारतीय समुदायातील लोकांचे आभारही मानले. ते म्हणाले की, येथील भारतीय लोक दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सहकार्याची भावना विकसित करत आहेत.
भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की ते आमचे शेजारी आहेत. प्रत्येकाला शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे असतात. मग तो वैयक्तिक आयुष्याचा भाग असो वा देश म्हणून. पण प्रत्येक नात्याची एक मूलभूत अट असते. तुम्ही माझा आदर करा, मी तुमचा आदर करीन. एस जयशंकर म्हणाले की आमच्या बाजूचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. नात्यात परस्पर आदर असतो तिथे आपण नाती निर्माण करतो. यासोबतच, दुसऱ्या बाजूनेही असाच विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, एप्रिल-मे 2020 मध्ये चीनसोबत विविध सीमेवर वाद झाला होता. त्यानंतर जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक चकमकीनंतर परिस्थिती आणखी कठीण झाली.