Russia Ukraine War : रशिया युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) एक वर्ष उलटून गेल्यानंतरही संपलेले नाही. युक्रेन अजूनही बलाढ्य रशियाला टक्कर देत आहे. या युद्धात अमेरिकेसह रशियाविरोधातील अन्य देशांचा युक्रेनला पाठिंबा मिळत आहे. मदतही मिळत आहे. त्यामुळे युद्धाचा निकाल अजून तरी लागलेला नाही.
युक्रेनला या देशांकडून लष्करी आणि आर्थिक मदत मिळत आहे. त्यामुळे इच्छा असतानाही रशिया अद्याप युक्रेनचा पाडाव करू शकलेला नाही. आता एक वर्ष उलटल्यानंतर युद्ध सुरुच आहे. मात्र या घातक अशा युद्धाचे अवशेष दिसत आहे. या युद्धाने शहरेच्या शहरे उद्धवस्त केली आहे. शाळा, कॉलेजेस, घरे, दवाखानेही जमीनदोस्त केली आहेत. पायाभूत सुविधांना जबर दणका बसला आहे. इतकेच नाही तर हजारो लोकांचा बळी गेला आहे.
हक्काचे घर सोडून लोकांना दुसऱ्या देशात परागंदा व्हावे लागले आहे. लहान मुले आणि महिलांचे अतोनात हाल झाले आहेत. इतका विध्वंस झाल्यानंतरही युद्ध सुरूच आहे. अमेरिकेसह अन्य देश आणि मोठ्या जागतिक वित्तीय संस्थांनी रशियानवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत.
मात्र, या निर्बंधांचा फारसा परिणाम रशियावर झाल्याचे दिसत नाही. रशियाच्या अडचणी जरूर वाढल्या आहेत. मात्र, अमेरिकेच्या विरोधी देशांचे सहकार्य रशियाला मिळत आहे. युरोपातील देशांनी रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी कमी केली असली तरी पूर्णतः बंद केलेली नाही. युरोपातील देशांना इंधनासाठी मोठ्या प्रमाणात रशियावरच अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे अमेरिकेने कितीही दबाव टाकला तरी या देशांना रशियाकडून खरेदी पूर्णपणे बंद करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.
रशियाच्या तेलाचे खरेदीदार कमी झाले असले तरी या काळात रशियाला भारत, चीनसारखे नवे खरेदीदार मिळाले आहेत. भारत आणि चीन या जगातील मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. भारत तर वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असून चीनला टक्कर देत आहे. या दोन्ही देशांची तेलाची मागणीही अफाट आहे.
रशिया भारताला सध्या सवलतीच्या दरात तेल देत आहे. त्यामुळे भारत सरकारनेही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणे सुरू ठेवले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतासह जे देश रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहेत ते देश हे तेल रिफाइन करून पुन्हा युरोपीय देशांनाच निर्यात करत आहेत.
सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिन एअर (CREA) संस्थेच्या लॉन्ड्रोमॅट – हाउ द प्राइस कॅप एलायन्स व्हाइटवॉश रशियन ऑइल इन थर्ड कंट्रीज या अहवालातून हा खुलासा करण्यात आला आहे.
रशियावरील निर्बंधांमुळे सध्या युरोपीय देश भारत, चीन, तुर्की, युएई, सिंगापूर या देशांकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहेत. भारत यामध्ये आघाडीवर आहे.