Russia : युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल (UNSC) मध्ये अमेरिका (America) आणि अल्बेनियाने एक ठराव आणला होता. यात रशियाच्या (Russia) बेकायदेशीर जनमताने युक्रेनच्या (Ukraine) भूभागावर रशियाच्या ताब्याचा निषेध केला. रशियाने युक्रेनमधून तात्काळ आपले सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी या ठरावात करण्यात आली. यासाठी UNSC मध्ये मतदानही झाले होते, पण भारताने (India) त्यापासून स्वतःला दूर केले. भारताबरोबरच चीननेही (China) मतदानापासून अंतर ठेवून रशियाला काही प्रमाणात पाठिंबा दिला.
युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमधील (United Nations Security Council) 15 देश या ठरावावर मतदान करणार होते, मात्र रशियाने याच्या विरोधात व्हेटोचा वापर केला. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. या ठरावाच्या समर्थनार्थ 10 देशांनी मतदान केले आणि चार देशांनी मतदानात भाग घेतला नाही. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गुरुवारी सांगितले की, धमकी देऊन किंवा बळाचा वापर करून दुसर्या देशाच्या भूभागावर कब्जा करणे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचे उल्लंघन करते.
युनायटेड नेशन्समधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी यांनी अमेरिका आणि अल्बेनियाने आणलेल्या ठरावावर UNSC मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना शांतता, मुत्सद्दीपणा आणि संवाद याबद्दल मत व्यक्त केले. ते म्हणाले की, युक्रेनमधील अलीकडच्या घडामोडींमुळे भारत व्यथित आहे. दहा देशांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले आहे. भारताबरोबरच चीन, ब्राझील आणि गॅबॉन या देशांनी मतदानात भाग घेतला नाही. कौन्सिलचा स्थायी सदस्य म्हणून रशियाने ठरावावर व्हेटो केला. हे प्रकरण महासभेत नेणार असल्याचे अमेरिकेने आधीच सांगितले आहे.
याआधी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनच्या चार प्रदेशांचे रशियन फेडरेशनमध्ये विलीनीकरण करण्याची औपचारिक घोषणा केली. लुहान्स्क, डोनेत्स्क, खेरसन आणि झापोरिझिया येथे राहणारे लोक कायमचे आमचे नागरिक बनत आहेत, असे रशियाने म्हटले होते. भारताने अद्याप युक्रेनमधील संघर्षाला रशियन आक्रमण म्हटलेले नाही.