मुंबई – टीम इंडियाचा एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत घेतलेल्या फिटनेस चाचणीत तो पास झाला आहे. आता तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताच्या T20 संघाचा नियमित कर्णधार झाल्यानंतर, रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत नेतृत्व केले आणि टीम इंडियाला 3-0 ने विजय मिळवून दिला. यानंतर त्याला एकदिवसीय संघाचा कर्णधारही बनवण्यात आले. मात्र, एकदिवसीय संघाचा कर्णधार झाल्यानंतर रोहितला दुखापत झाली आणि तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत खेळला नाही.
रोहितच्या हाताला दुखापत झाली होती. यातून सावरण्यासाठी त्याला सुमारे सात आठवडे लागले. यादरम्यान भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला. या दोन्ही मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका 1-2 ने आणि एकदिवसीय मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, रोहितने त्याची फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे आणि 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तो भारतीय संघाचे नेतृत्व करेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच निवड होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील खराब कामगिरीनंतर अनेक खेळाडूंना वनडे संघातून वगळले जाऊ शकते.
जसप्रीत बुमराहला विश्रांती ?
कामाचा ताण कमी करण्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिन्ही कसोटी आणि तिन्ही एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यांच्याशिवाय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि रविचंद्रन अश्विन यांना संघातून बाहेर केले जाऊ शकते. या दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये अतिशय खराब कामगिरी केली होती.