मुंबई : कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागलेला भारतीय संघ एकदिवसीय मालिकेतही बॅकफूटवर दिसला आणि दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचे स्वप्न यावेळीही पूर्ण करता आले नाही. दुसरा एकदिवसीय सामन्यातही आफ्रिकेने पराभव केला. दोन्ही मालिकांमध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना आता रविवारी केपटाऊनमध्ये होणार आहे. भारतीय संघास दुसरा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे होते. मात्र, या सामन्यातही खेळाडूंनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. भारताने दुसरा सामना का गमावला आणि मालिका का गमावली याची 5 मोठी कारणे जाणून घेऊ या..
विराट कोहली खाते न उघडता बाद झाला. पहिल्यांदाच एका फिरकीपटूने त्याला शून्यावर बाद केले. कोहलीशिवाय शिखर धवन 29 रन करून बाद झाला. केएल राहुलने निश्चित अर्धशतक केले, पण तो फार मोठी खेळी खेळू शकला नाही आणि केवळ 55 धावा करू शकला. आघाडीच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या न केल्याने मधल्या फळीवर दडपण होते.
दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाची मधली फळी फ्लॉप ठरली. व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. ऋषभ पंतने निश्चितपणे 85 रन केले पण, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर पुन्हा अपयशी ठरले. श्रेयसने 11 तर व्यंकटेशने केवळ 22 रन केले.
भारतीय गोलंदाजांना सुरुवातीला यश मिळवता आले नाही. गोलंदाजांना पहिली विकेट मिळवण्यासाठी 22 ओव्हर टाकाव्या लागल्या. पण तोपर्यंत आफ्रिकेच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला होता. मालन आणि टेंबा बावुमा यांच्या विकेट पडल्यानंतरही गोलंदाजांना उर्वरित फलंदाजांना बाद करता आले नाही. भुवनेश्वर कुमार पूर्ण अपयशी ठरला आणि त्याने पहिल्या 4 ओव्हरमध्ये तब्बल 40 रन दिले.
एकदिवसीय मालिकेत कर्णधार म्हणून केएल राहुलच्या निर्णयावर बरीच टीका होत आहे. राहुलने निर्णायक वेळी असे काही निर्णय घेतले, जे संघाच्या हिताचे नव्हते. राहुलने विकेट घेताना शार्दुल ठाकूरला गोलंदाजीतून दूर केले. शार्दुलच्या जागी व्यंकटेश अय्यरकडे गोलंदाजी सोपवण्यात आली. फलंदाजीतही राहुलने बचावात्मक वृत्ती स्वीकारली. विराटची विकेट पडल्यानंतर त्याचा वेग बराच कमी झाला.
भारतीय फिरकीपटूंना या सामन्यात फारसा प्रभाव पाडता आला नाही. चहलने 10 षटकांच्या स्पेलमध्ये 47 रन देऊन एक बळी घेतला तर अश्विनने 68 रन दिले. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत चार विकेट घेतल्या. यजमान संघाच्या फिरकीपटूंनी भारतीय संघास मोठी भागीदारी करण्याची संधी दिली नाही.