IND vs PAK : भारतीय संघाचा युवा आश्वासक सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पहिल्यांदाच विश्वचषक संघात (World Cup 2023) स्थान मिळवणाऱ्या या सुपरस्टार फलंदाजाला डेंग्यूमुळे सुरुवातीच्या सामन्यांतून बाहेर बसावे लागले होते. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धचे सामने हुकल्यानंतर पाकिस्तानसोबतही (IND vs PAK) सामना खेळण्याबाबत शंका निर्माण झाली होती. शुभमन गिलने अप्रतिम फिटनेस दाखवला आणि विश्वचषकात पदार्पण केले.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय स्टार गोलंदाजांनी 50 षटकांआधीच पाकिस्तान संघाला ऑल आऊट केले. सिराजने विकेट घेण्यास सुरुवात केली आणि रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) शेवटची विकेट घेतली. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्यासह सर्व 5 गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या आणि पाकिस्तानला 191 धावांत गुंडाळले.
डेंग्यूला हरवून विश्वचषकात पदार्पण
भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलला विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. टूर्नामेंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर डेंग्यूने आजारी होता. चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडल्यानंतर तो अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीला पोहोचला नाही. तिसऱ्या सामन्यापूर्वी अहमदाबादला पोहोचल्यानंतर फिटनेस सिद्ध करत पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात पदार्पण केले.
पहिल्याच सामन्यात निराशा
अहमदाबादमध्ये भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलचा फलंदाजीचा विक्रम जबरदस्त आहे. विश्वचषकात पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळताना त्याने शानदार सुरुवात केली पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. 11 चेंडूत 4 चौकारांसह 16 धावा केल्यानंतर तो शाहीन शाह आफ्रिदीच्या चेंडूवर शादाब खानकरवी झेलबाद झाला.