IND vs PAK : 10 सप्टेंबर रोजी आशिया कप स्पर्धेमध्ये (Asia Cup 2023) भारत-पाकिस्तान (IND vs PAK) दुसऱ्यांदा भिडतील. 2 सप्टेंबरला दोघे पहिल्यांदा आमनेसामने आले तेव्हा पावसामुळे सामना रद्द करावा लागला. यावेळी पावसामुळे कोणताही त्रास होऊ नये यासाठी एसीसीने (आशियाई क्रिकेट परिषद) मोठे पाऊल उचलले आहे.
श्रीलंकेचे हवामान पाहता आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुपर-4 सामन्यासाठी राखीव दिवस जोडण्याचा निर्णय घेतला. इतर कोणत्याही सुपर-4 सामन्यासाठी राखीव दिवस असणार नाही.
याचा अर्थ असा की 10 सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तानच्या मोठ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर तो सामना जिथे थांबवला होता तिथून दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करता येईल. ACC ने एका निवेदनात म्हटले आहे की, “10 सप्टेंबर 2023 रोजी आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम कोलंबो येथे खेळल्या जाणाऱ्या पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सुपर-4 सामन्यासाठी राखीव दिवसाचा समावेश करण्यात आला आहे.”
“पाकिस्तान आणि भारत सामन्यादरम्यान प्रतिकूल हवामानामुळे खेळण्यास प्रतिबंध झाल्यास सामना 11 सप्टेंबर 2023 रोजी खेळवला जाईल. तसेच 17 सप्टेंबर रोजी खेळल्या जाणार्या आशिया कप फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
पावसामुळे सामना राखीव दिवशी आयोजित केल्यास ACC ने प्रेक्षकांना त्यांच्या सामन्याची तिकिटे राखून ठेवण्यास सांगितले आहे. जी राखीव दिवशी वैध मानली जातील. साखळी टप्प्यातील पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा झाली होती. आता मात्र परिषदेने एक दिवस राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.