मुंबई: 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. हॅमिल्टनच्या सिडॉन पार्कवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. दीपक हुडा आणि दीपक चहर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली तर शार्दुल ठाकूर आणि संजू सॅमसनला बाहेर बसावे लागले. भारतासाठी ही स्पर्धा ‘करा किंवा मरो’सारखी आहे.
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे, तर यजमान न्यूझीलंडचा संघ दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका ताब्यात घेण्याच्या इराद्याने उतरेल. ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांना 306 धावांचे आव्हान राखण्यात अपयश आले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाची सावली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवन अँड कंपनीकडे सहाव्या गोलंदाजाची कमतरता होती.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये हॅमिल्टनमध्ये 7 वनडे सामने खेळले गेले आहेत. यजमान संघाने 6 सामने जिंकले आहेत तर भारताचा एक विजय आहे. 2009 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने येथे एकमेव एकदिवसीय सामना जिंकला होता. 13 वर्षांनंतर टीम इंडिया सेडन पार्कवर दुसऱ्या विजयाची प्रतीक्षा करत आहे. भारतीय संघाची फलंदाजी सुरू झाली असून सध्या मैदानावर कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल ही जोडी फलंदाजीसाठी उतरली आहे. भारताच्या पहिल्या 3 षटकात एकही गडी न गमावता 12 धावा झालेल्या आहेत.
- हेही वाचा:
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकले; टीम इंडिया करणार प्रथम फलंदाजी
- शुभमन गिल चार वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये पदार्पणाच्या वनडेत ठरला होता अपयशी; आजच्या सामन्यात केली कसर पूर्ण