IND vs AUS : भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे, ज्यामध्ये भारताने पहिले दोन सामने जिंकून 2-0 मालिकाही जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना फक्त औपचारिकतेचाच राहिला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना 27 सप्टेंबर रोजी होणार आहे.
राजकोटमध्ये खेळल्या जाणार्या या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अतिशय धक्कादायक बातमी दिली आहे. तिसऱ्या वनडेसाठी भारताचे पाच खेळाडू उपलब्ध होणार नाहीत. कर्णधार रोहितने सांगितले की, काही खेळाडू आजारी आहेत तर काही खेळाडू घरी परतले आहेत.
वास्तविक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघातील (Team India) 13 खेळाडूंमधून प्लेइंग-11 निवडले जाईल. कर्णधार रोहितने सांगितले की, शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी पहिल्या दोन वनडे सामन्यात खेळलेले शमी, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्या वैयक्तिक कारणांमुळे आपापल्या घरी परतले आहेत. अक्षर पटेलही सामन्यासाठी उपलब्ध नाही.
कर्णधार रोहित पुढे म्हणाला की, काही खेळाडू आजारी पडले आहेत. त्यामुळे ते तिसऱ्या वनडेसाठी उपलब्ध होणार नाहीत आणि आम्ही या प्रकरणात काहीही करू शकत नाही.
रोहित-विराट परतणार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वरिष्ठ खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतणार आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विश्रांती मिळाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या वनडेत कर्णधारपद भूषवणार आहे.
भारताने आधीच मालिका जिंकली
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये भारताने 99 धावांनी विजय मिळवला, तर पहिला एकदिवसीय सामना भारताने 5 विकेटने जिंकला. राजकोटमध्ये खेळवण्यात येणारा तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला व्हाईय वॉश देण्याच्या इराद्याने टीम इंडिया आता मैदानात उतरेल.