IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ (IND vs AUS) वनडेमध्ये आतापर्यंत 146 वेळा भिडले आहेत. दोन्ही संघ 43 वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमनेसामने आहेत. येथे ऑस्ट्रेलियाचा (Australia) वरचष्मा आहे. ऑस्ट्रेलियाने 82 सामने जिंकले आहेत तर भारताने 54 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 10 सामन्यांचा निकाल लागला नाही. येथे भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी 36.98 टक्के आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी 56.16 टक्के आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ या वर्षी मार्चमध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे भेटले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला होता. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या गेलेल्या या एकदिवसीय मालिकेत कांगारू संघाने 0-1 अशा पिछाडीनंतर पुनरागमन केले आणि मालिका 2-1 ने जिंकली. अर्थात टीम इंडिया (Team India) घरच्या मैदानावर खेळत असली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर त्यांचा विक्रम काही खास नाही. म्हणजे कांगारूंविरुद्ध फारसा फायदा घेण्यात भारतीय संघ आतापर्यंत अपयशी ठरला आहे.
भारताने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 67 एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात कांगारू संघाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने 32 सामने जिंकले आहेत तर भारतीय संघ 30 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. या कालावधीत 5 सामन्यांचा निकाल लागला नाही.
मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी 44.77 आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची विजयाची टक्केवारी 47.76 आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 22 सप्टेंबरला मोहालीत पहिल्या वनडेत भिडणार आहेत. दुसरा एकदिवसीय सामना 24 सप्टेंबरला इंदूरमध्ये तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवला जाईल. तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून खेळवले जातील.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाचे नेतृत्व करेल. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) दोन्ही सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. भारताने 20 महिन्यांनंतर अनुभवी ऑफस्पिनर आर अश्विनचा (R. Ashwin) वनडे संघात समावेश केला आहे. 2017 मध्ये संघातून वगळल्यानंतर अश्विनने केवळ 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत. विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघ विश्वचषकात खेळणार आहेत.