IND vs AUS : केएल राहुल (KL Rahul) त्याच्या नेतृत्वाखाली संघाला मालिका जिंकून देण्यासाठी मैदानात उतरेल. तिसरा वनडे 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. त्या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुनरागमन करेल. 5 ऑक्टोबरपासून होणाऱ्या विश्वचषकापूर्वी भारत या मालिकेद्वारे तयारीला अंतिम रूप देत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२४ सप्टेंबर) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने पाच गडी राखून विजय मिळवला होता. आता इंदूरमधील दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेण्यावर त्यांचे लक्ष असेल. यावर्षी भारत दुसऱ्यांदा येथे वनडे खेळणार आहे.
भारत 2006 मध्ये इंदूरमध्ये पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून टीम इंडियाने येथे सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत सर्व सामने जिंकण्यात यश आले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात दोन्ही संघ एकदाच आमनेसामने आले आहेत. 2017 मध्ये टीम इंडियाने त्याचा 5 विकेट्सने पराभव केला होता.
इंदूरमध्ये सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर?
इंदूरमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज वीरेंद्र सेहवाग आहे. दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 220 धावा आहेत. तर रोहित शर्माने पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये 205 धावा केल्या आहेत. सध्याच्या संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर शुभमन गिलच्या एका सामन्यात 112 धावा आहेत.
इंदूरमध्ये सर्वाधिक विकेट कोणाच्या?
भारताकडून या मैदानावर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज एस. श्रीशांत आहे. एका सामन्यात त्याच्या नावावर सहा विकेट आहेत. कुलदीप यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुलदीपने येथे दोन सामने खेळले असून पाच विकेट्स घेतल्या आहेत. सध्याच्या संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा आघाडीवर आहे. त्याच्या एका सामन्यात तीन विकेट्स आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात काय घडलं?
इंदूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदाच आमनेसामने आले आहेत. तेव्हा स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता आणि विराट कोहली भारताचा कर्णधार होता. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने 50 ओव्हर्समध्ये 6 गडी बाद 293 धावा केल्या होत्या. अॅरॉन फिंचने 124, स्टीव्ह स्मिथने 63 आणि डेव्हिड वॉर्नरने 42 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने 5 विकेट गमावत 294 धावा करत सामना जिंकला. हार्दिक पांड्याने 78, रोहित शर्माने 71 आणि अजिंक्य रहाणेने 70 धावा केल्या. मनीष पांडेने नाबाद 36 आणि विराट कोहलीने 28 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या होत्या.