Income Tax Notice : प्रत्येक व्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर असते. आयकर विभागाला काही शंका आल्यास याचा फटका आपल्याला बसू शकतो. तसेच काही ठिकाणी व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला आयकर नोटीस येईल.
समजा तुम्ही रोख रक्कम देऊन छोटी खरेदी केली तरी 5 उच्च मूल्याचे रोख व्यवहार करणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. कर विभागाला याची माहिती होताच तुम्हाला नोटीस मिळेल. हे कोणते व्यवहार आहेत? जाणून घ्या.
मर्यादेपेक्षा जास्त पैसे
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) च्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली तर त्याची माहिती आयकर विभागाला देण्यात येते. हे पैसे एक किंवा अधिक खात्यांमध्ये जमा केले जातात. आता तुम्ही विहित मर्यादेपेक्षा जास्त पैसे जमा करत असाल तर कर विभाग तुम्हाला या पैशाच्या स्रोताबद्दल विचारू शकतो.
शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स किंवा बाँड्सची खरेदी
शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर किंवा रोखे मोठ्या प्रमाणात रोख वापरून खरेदी केले तर हे आयकर विभागाला अलर्ट करू शकते. एखाद्या व्यक्तीने 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त व्यवहार केला तर त्याची माहिती प्राप्तिकर विभागापर्यंत पोहोचते.
मुदत ठेवी
बँक खात्यात 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यावर जसे प्रश्न निर्माण होतात, तसेच मुदत ठेवच्या बाबतीतही होते. एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक एफडीमध्ये रु. 10 लाख पेक्षा जास्त रक्कम जमा केली तर आयकर विभाग तुम्हाला पैशाच्या स्रोताबद्दल माहिती विचारेल.
मालमत्तेच्या खरेदीसाठी रोख व्यवहार
तुम्ही मालमत्ता खरेदी करताना 30 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा रोख व्यवहार केला तर मालमत्ता निबंधक निश्चितपणे आयकर विभागाला माहिती देतील.
क्रेडिट कार्ड बिल
समजा तुमचे क्रेडिट कार्डचे बिल 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही ते रोखीने भरत असाल, तरीही तुम्हाला पैशाचा स्रोत विचारला जाऊ शकतो. तुम्ही आर्थिक वर्षात 10 लाख रुपये किंवा जास्त रक्कम कोणत्याही माध्यमातून भरली तर आयकर विभाग तुम्हाला विचारू शकतो की हे पैसे कुठून आले.