IMD Alert : नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD Alert) 15-16 नोव्हेंबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाच्या सर्व तुकड्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. रविवारपासून पुढील पाच दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परंतु 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी पोर्ट ब्लेअर, कॅम्पबेल खाडी, कामोर्ता आणि दिगलीपूर या द्वीपसमूहातील काही भागांत पावसाचा इशारा दिला आहे.
आपत्ती व्यवस्थापन संचालनालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खराब हवामानामुळे अंदमान समुद्रात वाऱ्याचा वेग 45 किमी होता. मच्छिमारांना येत्या काही दिवसांत समुद्रात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. यासोबतच पर्यटकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. कॉर्बिन कोव्ह, स्वराज, एलिफंटा, कॉलिनपूर बीच, शहीद द्वीप आणि वंदूर इत्यादी ठिकाणी लोकांना समुद्रात न जाण्यास सांगितले आहे. खराब हवामानामुळे कोलकाता, दिल्ली, विशाखापट्टणम आणि चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला जाणारी विमानसेवा प्रभावित होऊ शकते.
भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर भारतीय राज्यांमध्ये तापमानात काही अंशांनी घट होण्याची शक्यताही हवामान कार्यालयाने वर्तवली आहे. 14 नोव्हेंबर रोजी जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस/बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. यासोबतच उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हलका पाऊस / हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. 14 नोव्हेंबर 2022 रोजी हरियाणा आणि पश्चिम राजस्थानमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील 48 तासांनंतर उत्तर पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसची घट होऊ शकते.
- हे सुद्धा वाचा : Heavy Rain: अबब… या ठिकाणी पुन्हा जोरदार पाऊस; शहर झाले जलमय
- Rain Alert : पावसाचा मुक्काम कायम..! ‘या’ राज्यांत बरसणार मुसळधार; पहा, कुठे होणार पाऊस ?