IMD Alert : देशातील अनेक राज्यात सध्या हवामानात झालेल्या बदलामुळे मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे काही राज्यात पूर देखील आला आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार पूर आणि पावसाचा सर्वात जास्त परिणाम हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दिसून येत आहे.
इकडे हिमाचल प्रदेशात, कुल्लू खोऱ्यात पूरस्थिती वाईट आहे. संततधार पावसामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. हिमाचलमध्ये पावसामुळे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. डोंगरापासून ते मैदानापर्यंत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दुसरीकडे पंजाब आणि दिल्लीतही नदीचे बंधारे तुटत आहेत.
यमुनेच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाजवळ
IMD ने भारतात मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने उत्तराखंडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीममध्ये आज म्हणजेच 12 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिल्ली/एनसीआरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.”
मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील 4 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तराखंडमधील चार जिल्ह्यांसाठी – नैनिताल, चंपावत, उधम सिंह नगर आणि पौरी गढवाल आज म्हणजेच 12 जुलै रोजी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने हरिद्वार, डेहराडून, टिहरी गढवाल, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
हरियाणात पावसामुळे 15 जणांचा मृत्यू
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंजाबमध्ये आठ आणि हरियाणामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. दोन्ही राज्यात आतापर्यंत एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांच्या संततधार पावसानंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक भागात पूरस्थिती कायम आहे.