ICC World Cup 2023 : यावर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषक (ICC World Cup) स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व 10 संघांची नावे समोर आली आहेत. आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगच्या आधारे या स्पर्धेत खेळणाऱ्या पहिल्या 8 संघांची नावे निश्चित करण्यात आली. अव्वल 8 एकदिवसीय क्रमवारीत स्थान मिळवणाऱ्या संघांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला. उर्वरित 2 संघांची नावे विश्वचषक पात्रता सामन्यांद्वारे निश्चित केली गेली.
आयसीसी विश्वचषकाचे यजमानपद भूषवणाऱ्या भारताने विश्वचषक सुपर लीगमध्ये सहावा क्रमांक पटकावला. यजमान असल्याने स्पर्धेत संघाची जागा आधीच पक्की झाली होती. भारत एकट्याने विश्वचषक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1987, 1996 आणि 2011 मध्ये शेजारी देशांसोबत स्पर्धा आयोजित केल्यानंतर बीसीसीआयसाठी ही एक मोठी उपलब्धी असेल.
सुपर लीगमध्ये चमकदार कामगिरी आयसीसी विश्वचषकात जागा पक्की करणाऱ्या टॉप 8 संघांमध्ये न्यूझीलँड पहिल्या क्रमांकावर आहे. सध्याचा विश्वचषक विजेता इंग्लँड संघ दुसऱ्या क्रमांकावर होता. बांगलादेशचा संघ तिसऱ्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर राहिला. अफगाणिस्तानचा संघ पाचव्या तर भारत सहाव्या क्रमांकावर होता. पाकिस्तान सातव्या क्रमांकावर तर दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटच्या क्रमांकावर होता.
13 पैकी शेवटच्या 5 संघांना जे विश्वचषक सुपर लीगमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यांना सहकारी देशांसोबत खेळून स्पर्धेत स्थान मिळवण्याची दुसरी संधी देण्यात आली. 5 सहकारी संघ आणि 5 प्रमुख संघांनी विश्वचषक पात्रता फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेने प्रथम क्वालिफायरद्वारे विश्वचषकासाठी जागा निश्चित केली, त्यानंतर नेदरलँड्सने स्कॉटलँडविरुद्ध विजय नोंदवून विश्वचषकाचे तिकीट मिळवले. नेदरलँड संघाला 11 नोव्हेंबर रोजी भारताविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. टीम इंडियाला या संघाबाबत सावधगिरी बाळगावी लागेल.
सर्वात मोठी निराशा 2 वेळा विश्वविजेत्या वेस्ट इंडिजकडून झाली. विश्वचषक पात्रता फेरी खेळण्यासाठी आलेल्या संघाला स्कॉटलँडविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ स्पर्धेत सहभागी होणार नाही. या व्यतिरिक्त झिम्बाब्वे आणि स्कॉटलँड या संघांनाही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.