ICC World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा (ICC World Cup 2023) आजपासून (5 ऑक्टोबर) सुरू झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लँड आणि न्यूझीलँड यांच्यात खेळला जात आहे. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेची चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. यावेळी भारतातील एकूण 10 शहरांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. भारत एकट्याने विश्वचषक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबाबत बीसीसीआयने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) म्हणाले की संपूर्ण विश्वचषकादरम्यान स्टेडियममध्ये सामने पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पिण्याचे पाणी पूर्णपणे मोफत असेल.
जय शाह यांनी ट्विटमध्ये लिहिले की ‘मला जाहीर करताना अतिशय अभिमान वाटतो की, भारतभरातील स्टेडियममध्ये सामने पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना आम्ही मोफत मिनरल वॉटर देत आहोत. पाणी प्या आणि खेळाचा आनंद घ्या. विश्वचषकादरम्यानच्या अविस्मरणीय आठवणी बनवू या.
प्रत्येक संघाचे किमान 9 सामने
यावेळी वनडे विश्वचषकातील सर्व संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. येथे राउंड रॉबिन अंतर्गत प्रत्येक संघ इतर सर्व 9 संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. अव्वल-4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. दोन उपांत्य फेरीच्या सामन्यांनंतर अंतिम सामना खेळवला जाईल. अंतिम सामना 19 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
या विश्वचषकातील संघांची संख्या मागील विश्वचषकांपेक्षा खूप कमी आहे. विशेष म्हणजे एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात दोन वेळा चॅम्पियन ठरलेला वेस्ट इंडिज या स्पर्धेचा भाग नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. विंडीजचा संघ यावेळी पात्र ठरू शकला नाही. भारतातील विश्वचषक 2023 सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल. तुम्ही Disney+Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग मोफत पाहू शकता.