मुंबई: ऑस्ट्रेलियात 30 वर्ष जुन्या योगायोगाची पुनरावृत्ती करत अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघासाठी अगदी शेवटच्या टप्प्यावर सर्वकाही बदलले. 30 वर्षांपूर्वी मेलबर्न क्रिकेट मैदानावर 1992 मध्ये इंग्लंडला पराभूत करून विश्वविजेता ठरलेला पाकिस्तान पुन्हा एकदा त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याच्या मार्गावर होता, पण इंग्लंडने ही इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. तीन वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर इंग्लंडला एकदिवसीय क्रिकेटचा विश्वविजेता बनवणाऱ्या बेन स्टोक्सने (नाबाद 52) सर्वात लहान फॉरमॅटच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा लढाऊ खेळी खेळत इंग्लंडला T20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद मिळवून दिले. यासोबतच इंग्लंडने पाकिस्तानसोबत 30 वर्षे जुना हिशोब चुकता केला.
मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर आज पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात T20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 8 बाद 137 धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडने उत्तम गोलंदाजीचा नमुना प्रस्तुत केला. शान मसूदच्या 38 धावा आणि कर्णधार बाबर आझमच्या 32 धावांच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडसमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघाने सुमार खेळी करत खूपच कमी धावसंख्या केली. इंग्लंडकडून सॅम कुरनने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर ख्रिस जॉर्डन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीनंतर बेन स्टोक्सच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. पाकिस्तानने ठेवलेल्या 138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने 19 षटकांत 5 विकेट्स राखून विजय मिळवला. बेन स्टोक्स 49 चेंडूत 52 धावा करून नाबाद परतला. याआधी पॉल कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2010 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता. आणि आज दुसऱ्यांदा इंग्लंड संघाने टी 20 विश्वचषकवर आपले नाव कोरले.
स्टोक्सने केली उत्तम फलंदाजी
जेव्हा बेन स्टोक्सने डावाची धुरा सांभाळली आणि हॅरी ब्रुकने त्याला काही काळ साथ दिली तेव्हा या जोडीने कमाल खेळी केली. तथापि, दोघेही नसीम शाह आणि शादाब खान यांच्यामुळे विशेषतः त्रस्त झाले आणि सीमारेषेसाठी आसुसले. त्यानंतर शादाबने ब्रुकला आपला बळी बनवून पाकिस्तानी संघाला परतवून लावले. स्टोक्सने मात्र हार मानली नाही आणि कठीण सामन्यात 16 व्या षटकात इफ्तिखारवर सलग दोन चौकार लगावत संघाला बाहेर काढले. यानंतर मोईन अलीने 17व्या षटकात पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन चौकार मारून इंग्लंडचा विजय निश्चित केला.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर; पाकिस्तानही रोखण्यासाठी करतोय जीवतोड प्रयत्न
- ICC T20 World Cup 2022: पराभवावर ‘हा’ खेळाडू झाला भावूक; पहा काय केली भावनिक पोस्ट