मुंबई- पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि इंग्लंडची टॅमी ब्युमॉंट यांची 2021 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुरुष आणि महिला T20 क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर जानेमन मलानला इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला आहे.
तर ओमानचा कर्णधार झीशान मकसूद आणि ऑस्ट्रियाचा अँड्रिया-मे झेपेडा यांना अनुक्रमे पुरुष आणि महिलांसाठी ICC असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर 2021 म्हणून निवडण्यात आले आहे. पुरुष आणि महिला क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे नामांकित वैयक्तिक पुरस्कारांची पहिलीच वेळ आहे.
पाकिस्तानच्या सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानने 2021 मध्ये T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती तर टॅमी ब्युमॉंटने महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वर्षातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरे स्थान पटकावले होते. रिझवानने गेल्या वर्षी केवळ 29 सामन्यांत 73.66 च्या सरासरीने आणि 134.89 च्या स्ट्राइक रेटने 1 हजार 326 धावा केल्या आहेत.
मागच्या वर्षात रिझवानने विकेटच्या मागे देखील प्रभावित केले आहे. तसेच पाकिस्तानला T20 विश्वचषक 2021 च्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. रिझवान हा स्पर्धेतील तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
त्याने 2021 मध्ये लाहोरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आणि कराचीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वर्षातील शेवटच्या T20 सामन्यात 87 धावा केल्या होत्या.
या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकामध्ये रिझवान ही कामगिरी कायम ठेवेल अशी आशा पाकिस्तानला आहे. रिजवानने टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध 55 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या होत्या, ज्यामुळे पाकिस्तानला या जागतिक स्पर्धेत भारतविरुद्ध पहिला विजय नोंदवण्यात यश मिळाला होता.