HSC Board 12th Result Date : महाराष्ट्र बोर्डाचा बारावी 2023 चा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना लागली आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावीच्या निकालासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
या वर्षी 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 दरम्यान 12वी परीक्षा (HSC परीक्षा) घेण्यात आली. बोर्ड लवकरच बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख अधिकृतपणे जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला जाहीर होणार आहे.
दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचे काम सुरू असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
राज्य शिक्षण मंडळाचे अधिकारी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासून निकालाच्या कामाचा आढावा घेत आहेत. बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 14,57,293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,92,780 मुले आणि 6,64,441 मुली आहेत. 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी राज्यभरात 3195 मुख्य केंद्रे तयार करण्यात आली होती, जिथे कडक देखरेखीखाली परीक्षा घेण्यात आली.