Home Guard Recruitment । स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या जिल्हा होमगार्ड कार्यालयातील रिक्त जागांच्या भरतीसाठी होमगार्ड सदस्य नोंदणी सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा समादेश होमगार्ड तथा अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्याकडून करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्हा होमगार्ड कार्यालयातील रिक्त जागा भरण्यासाठी होमगार्ड सदस्य नोंदणीचे आयोजन केले आहे. १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी.
हे लक्षात घ्या की होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम आणि अटी याबाबतची विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login१.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सर्व अर्जांची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी तसेच शारीरिक क्षमता, मैदानी चाचणी याची तारीख जाहीर केली जाईल.
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा (तळोदा पथकांतर्गत धडगाव) अक्कलकुवा व नवापूर (नवापूर महिला वगळून) या पथकामधील पुरुष/महिला होमगार्डची नवीन सदस्य नोंदणी सुरू आहे. नोंदणीसाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे असतील.
पथकातील पोलिस ठाण्यांतर्गत रहिवासी पुरावा म्हणून मतदान कार्ड/आधारकार्ड, वय २० ते ५० वर्षे असावे. शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण तसेच उंची पुरुषासाठी आणि महिलांसाठी वेगवेगळी राहील. पुरुषासाठी उंची १६२ सेंटिमीटर आणि महिलांसाठी १५० सेंटिमीटर असेल. पुरुषांकरिता छाती न फुगविता ७६ सेंटिमीटर कमीत कमी ५ सेंटिमीटर फुगविणे गरजेचे आहे. संबंधित पुरुष/महिला उमेवारास विहित वेळेत धावणे आणि गोळाफेक याची शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे.