Home Buyer Benefit : दुसरं घर खरेदी करताय? फायदा किती, नुकसान काय; आधी जाणून घ्या…

Home Buyer Benefit : भारतात असे अनेक लोक आहेत जे पैशांची गुंतवणूक म्हणून (Home Buyer Benefit) एक किंवा एकापेक्षा जास्त घर खरेदी (Second Home) करतात. त्यामुळे भारतात घरांची मागणी सातत्याने वाढत चालली आहे. 2021 मध्ये सुमारे दहा हजार कोटी सेकंड होम खरेदी करण्यासाठी खर्च करण्यात आले. घर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती असणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल नव्हे या गोष्टी तुम्हाला माहीत असल्याच पाहिजेत. जेणेकरून तुम्हाला घर खरेदीच्या व्यवहारात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

खरे तर आजच्या शहरीकरणाच्या आणि वाढत्या संपत्तीच्या काळात अनेकांनी दुसरे घर घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. व्हॅकेन्सी ग्लोबल इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासानुसार भारताच्या शहरी भागात या संदर्भात भरपूर क्षमता आहे. सन 2031 पर्यंत शहरी लोकसंख्या 60 कोटींच्या आसपास असेल. दुसऱ्या घरात गुंतवणूक ही एक आकर्षक संधी आहे. ती फक्त आर्थिक उद्दिष्टे आणि वैयक्तिक कर्ज पूर्ण करण्यात मदत करत नाही तर अशा प्रकारची मालमत्ता तुमच्या रियल इस्टेट पोर्टफोलिओमध्ये विविधता आणते. दुसरे घर खरेदी करून तुम्ही ते भाडोत्री दिल्यास त्यातून अतिरिक्त उत्पन्न देखील मिळू शकता. मात्र दुसरे घर खरेदी करण्याआधी काही गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल.

दुसऱ्या घराची गरज का?

आधी तुम्ही ठरवा तुम्हाला दुसरे घर का खरेदी करायचे आहे. तुम्ही घर खरेदी गुंतवणुकीसाठी करत आहात किंवा तुम्ही ते सेवानिवृत्तीसाठी किंवा इतर काही कारणांसाठी विकत घेत आहात या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कुठे कोणत्या प्रकारची मालमत्ता खरेदी करायची आहे आणि त्यावर किती पैसा खर्च करायचा आहे हे आधी ठरवा. 360 रिएल्टर्सच्या अभ्यासानुसार भारतात कोरोनानंतर हॉलिडे होम्स किंवा सेकंड होम्सची मागणी वाढली आहे. गतिमान जीवनशैलीमध्ये मोठ्या संख्येने लोक सेकंड होममध्ये गुंतवणूक करत आहेत.

Home Buyer Benefit

Home Loan Rejection : वारंंवार रिजेक्ट होतोय होम लोनचा अर्ज; ‘या’ 5 गोष्टी तर जबाबदार नाहीत?

सुरुवात कुठून करावी

तुमची जीवनशैली मालमत्तेची किंमत भविष्यातील उत्पन्न या गोष्टींचा विचार करा. मालमत्ता कर, विमा खर्च आणि इतर नियम काय आहेत याची देखील माहिती घ्या त्यानंतरच तुम्ही मालमत्तेचे ठिकाण आणि त्याचा प्रकार निश्चित करू शकता.

आर्थिक परिस्थिती तपासा

ही जबाबदारी घेण्यापूर्वी तुम्ही तुमची आर्थिक स्थिरता सुनिश्चित करा. विशेषतः तुमच्याकडे कोणतेही कर्ज असल्यास आणि त्याची परतफेड करणे बाकी असेल तर दुसरे घर खरेदी करण्याचा विचार टाळा. तुम्ही दुसरे कर्ज घेण्याआधी तुमच्या कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करा. दुसरे घर खरेदी करण्यासाठी दर महिन्याला तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील याची गणना करण्यासाठी काही गोष्टींचा विचार करा. तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की कमाई आणि कर्ज परतफेडीचे गुणोत्तर 50% पेक्षा कमी असावे.

Home Buyer Benefit

डाऊन पेमेंटची व्यवस्था करा

आता मुद्दा येतो तो डाऊन पेमेंटचा. येथे जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करण्याचा (Down Payment) प्रयत्न करा. कर्जाची रक्कम आणि मासिक पेमेंट कमी करण्यासाठी कमीत कमी २० टक्के किंवा त्याहून अधिक डाऊन पेमेंट भरू शकाल अशी तजवीच करा. तुमची विद्यमान बचत आणि अन्य आवश्यक खर्च वजा करून तुम्ही डाऊन पेमेंट साठी निधी निश्चित करू शकता.

Loan Transfer Process : वैयक्तिक कर्ज दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या

अन्य खर्च दुर्लक्षित करू नका

मालमत्ता कर, विमा हप्ता, देखभाल किंवा इतर भविष्यातील खर्च यांसारखे अतिरिक्त खर्च सुद्धा लक्षात ठेवा. तुमची सध्याची जीवनशैली सांभाळून तुम्ही या बजेटमध्ये नवीन जबाबदारी सहजतेने हाताळू शकता का हे आधी पहा आणि यानंतर तुमची पैसे देण्याची क्षमता धोक्यात येणार नाही याचाही विचार करा. याशिवाय कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीसाठी काही पैसे बाजूला काढून ठेवा. यानंतरच दुसरे घर खरेदी करण्यासाठी पैसे शिल्लक राहत असतील तर दुसरे घर खरेदी करण्याचा विचार करा. अन्यथा हा मार्ग स्वीकारला नाही तरी चालेल.

Home Buyer Benefit

कायदेशीर बाबींची माहिती ठेवा

तुम्ही दुसरे घर खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला त्याच्याशी संबंधित सर्व कायदेशीर बाबींची माहिती असणे आवश्यक आहे. मालमत्तेवर कोणतेही कायदेशीर बंधन नाही हे आधी तपासा. मालमत्तेची विक्री करणारी व्यक्ती तिचा कायदेशीर मालक आहे आणि या मालमत्तेवर कोणताही वाद नाही याची आधी खात्री करा. मालमत्तेवर कोणतेही कायदेशीर दावे किंवा कर्ज नाहीत याची खात्री करण्यासाठी प्रमाणपत्रे देखील मिळवा याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र ही तपासा.

कराचे फायदे तपासा

दुसरे घर घेण्याआधी तुम्हाला कोणते कर लाभ मिळू शकतात याची माहिती घ्या. यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न कमी होण्यास मदत होईल. मालमत्तेचे मूल्य कालांतराने वाढते आणि तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळू लागते जे तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वापरू शकता.

Leave a Comment